(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अलीकडेच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहर शेख यांचा मुंब्रा येथून विजय झाला. पण त्याच्या विजयानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यावर आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने खोचकपणे प्रतिक्रिया देत नगरसेविकेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधून असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षातर्फे सहर शेख या तरुणीचा विजय झाला. निवडणुकीतील या विजयानंतर केलेल्या भाषणात सहर शेख यांनी,“कैसा हराया, अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना है,”
असे वक्तव्य करत थेट जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते.
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या वक्तव्यावर एका मराठी अभिनेत्याने खोचक प्रतिक्रिया देत ‘मुंब्रा नको…’ असे म्हणत टोला लगावला, आणि त्याची पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने सहर शेख यांच्या वक्तव्यावर आपल्या अनोख्या आणि खोचक शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून, तो नियमितपणे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतो. यासोबतच तो अनेकदा समसामयिक आणि राजकीय विषयांवरही आपली स्पष्ट मतं मांडतो.
या व्हिडीओमध्ये अभिनेता झाडे लावताना दिसतो आहे. सहर शेख यांच्या विधानाची खिल्ली उडवत तो म्हणतो,“हरा कर दिया ना… अरे, मी तर म्हणतो फक्त मुंब्राच नव्हे, तर अख्खा हिंदुस्थान हिरवा करून टाका. काय ताई… नाय कळलं? अहो, आमच्यात पण हिरवं करतात; पण ते झाडे लावून. झाडे लावा, झाडे जगवा! वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…”
दरम्यान,या व्हिडिओखाली अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक कलाकारांनी देखील या पोस्टखाली कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






