(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टॉलीवूड मेगास्टार चिरंजीवी यांनी अभिनेता म्हणून ४७ गौरवशाली वर्ष पूर्ण केली आहेत.त्यांचा पहिला चित्रपट, प्रणम खरेदू, बरोबर ४७ वर्षांपूर्वी २२ सप्टेंबर १९७८ रोजी प्रदर्शित झाला होता. पार्श्वभूमी नसलेल्या चिरंजीवी यांनी एन.टी. रामा राव, अक्किनेनी नागेश्वर राव आणि कृष्णा यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या काळात तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.१९८३ मध्ये आलेला खैदी हा चित्रपट चिरंजीवी यांच्या कारकिर्दीत क्रांतीकारी ठरला. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक सिनेमांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं. गँग लीडर, जगदेका वीरुडु अतिलोका सुंदरी, घराना मोगुडु, कोदमा सिम्हम यांसारख्या यशस्वी चित्रपटांनी त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढवली.
चिरंजीवी यांनी चित्रपटांच्या पलीकडेही समाजासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या चिरंजीवी चॅरिटेबल ट्रस्टने लाखो लोकांना डोळ्यांची दृष्टी बहाल केली आणि हजारो रक्तदान शिबिरे आयोजित केली. त्यांचे चाहतेही त्यांच्या या कार्यात सक्रिय सहभागी झाले आहेत. चिरंजीवी यांनी काही काळासाठी राजकारणातही प्रवेश केला, मात्र तेथील यश मर्यादित राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा संपूर्ण लक्ष चित्रपटांकडे वळवलं. आजही ते अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत.
सन्मान आणि पुरस्कारांनी भरलेली कारकीर्द
चिरंजीवी यांना भारत सरकारने पद्मभूषण (२००६) आणि पद्मविभूषण (२०२४) या सन्मानांनी गौरवलं आहे. त्यांनी फिल्मफेअर साउथ, नंदी पुरस्कार, ए.एन.आर. राष्ट्रीय पुरस्कार, रघुपती वेंकय्या पुरस्कार, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, आणि मानद डॉक्टरेट मिळवली आहे.
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’मध्ये झळकणार ‘हा’ TV अभिनेता, वर्षानुवर्षांच स्वप्न झालं पूर्ण
सध्या चिरंजीवी हे अनिल रविपुडी दिग्दर्शित “मना शंकरा वरा प्रसाद गरु” या चित्रपटात काम करत आहेत. याशिवाय श्रीकांत ओडेला आणि बॉबी कोल्ली यांच्या आगामी अॅक्शन चित्रपटांमध्येही ते झळकणार आहेत.