मुंबई – लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochna Chavan) यांचे आज दुपारी १२ वाजता मुंबईतील फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. भारत सरकारने पद्मश्री (Padmashree) देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याच्या निधनाने सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे.
सुलोचना श्यामराव चव्हाण यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सुलोचना महादेव कदम, तर आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. वयाच्या दहाव्या वर्षी सुलोचना कदम यांचे पहिले गाणे ध्वनिमुद्रित (Song Recording) झाले. ‘कृष्णसुदामा’ (Krushna Sudama) या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम मराठी गाणे गायले. या चित्रपटाच्या श्यामसुंदर पाठक व भट्टाचार्य या संगीत दिग्दर्शकांच्या जोडीने त्यांना प्रथम गायनाची संधी दिली होती. वयाच्या अकराव्या वर्षापासून सुलोचना चव्हाण यांनी पार्श्वगायनास सुरुवात केली.
सुलोचना चव्हाण यांनी मराठीबरोबर अनेक हिंदी, पंजाबी आणि गुजराती गाणीही गायली आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे कोल्हापूरच्या श्यामराव चव्हाण यांच्याशी लग्न झाले. लावणी गाण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सुलोचना चव्हाण यांनी आपल्या पतीकडूनच घेतले, म्हणूनच आपल्या पतीलाच त्या गुरू मानत होत्या. सुलोचना चव्हाण यांनी १९६२ मध्ये ‘रंगल्या रात्री’ या चित्रपटासाठी पहिली लावणी गायली.
‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची’ या लावणीनंतर सुलोचना यांचे सर्व आयुष्यच बदलून गेले. तसेच, ‘खेळताना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘राग नका धरू सजना’, ‘पाडाला पिकला आंबा’, ‘लाडे लाडे बाई करू नका’, अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या गायल्या.
आचार्य अत्रे यांनी सर्वप्रथम दिलेली ‘लावणी सम्राज्ञी’ (Lavni Samradni) ही उपाधी त्यांनी आयुष्यभर सांभाळली. सुलोचना यांचा मोठा मुलगा जय याचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा दुसरा मुलगा विजय उत्कृष्ट ढोलकी व तबलावादक आहे. राज्यशासनामार्फत २०१० या वर्षासाठी संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार त्यांना मिळाला. सुलोचना चव्हाण यांनी ‘माझे गाणे माझे जगणे’ हे आत्मचरित्र लिहिले असून लावणीच्या संदर्भातील अनेक आठवणी त्यांत आहेत.