विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशीचे नवे वादग्रस्त वक्तव्य (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच या ना त्या गोष्टीमुळे आणि आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो आणि आता त्याने एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. नुकत्याच ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने मराठमोळी पत्नी पल्लवी जोशीसमोर महाराष्ट्रातील सर्वात आवडता पदार्थ वरण-भाताला ‘गरिबांचे जेवण’ म्हटलं आहे आणि अनेकांनी आता त्याला यासाठी ट्रोल केलं आहे.
वरण – भाताला आपल्याकडे पूर्णान्न समजण्यात येतं आणि असं असतानाही विवेक अग्रिहोत्रीने जेव्हा वरण भाताला नावं ठेवली तेव्हा त्याच्या पत्नीने मराठी असतानाही त्याला न थांबवता त्यावर हसण्याची प्रतिक्रिया दिल्यामुळे ती अधिक ट्रोल झाली आहे. बंगाल फाईल्स नावाचा त्यांचा लवकरच चित्रपट येत असून कोणत्याही गोष्टी ओढूनताणून करण्यात येत असल्याचंही म्हटलं जात आहे.
विवेक अग्रिहोत्रीने काम्या जानीला मुलाखत देताना वरण भाताबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘मी दिल्लीतून आलो होते आणि तिथे तंदुरी, कबाब, चिकन असं मसालेदार जेवण नेहमी खाल्लंय आणि इथे गेल्यावर हे म्हणाले वरण भात खा, माझं नवीनच लग्न झालं होतं. मी वरण भात खाल्ला, मग कढी खायला सांगितली, मराठी लोकांची कढी म्हणजे तर खाऊन मला वाटलं की, हे तर शेतकऱ्यांसारखं गरीब लोकांचं जेवण जेवतात..’ हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाल्यापासून अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनीही यावर व्यक्त होण्यास सुरूवात केली आहे. मुळात पल्लवी जोशी मराठमोळी असतानाही तिने विवेक अग्निहोत्रीला हे बोलण्यापासून थांबवलं नाही यावर अधिक राग व्यक्त होताना दिसून येत आहे.
वरणभाताबद्दल बोलताना विवेक अग्रिहोत्रीने काम्याला सांगितले की, ‘माझ्यासाठी वरण भात हा एकदम कल्चरल शॉक होता, इतके साधे जेवण! मला वाटायचे हे गरिबांचे जेवण आहे, पण नंतर माझ्या लक्षात आले की, वरण भात हे अत्यंत पौष्टिस आणि साधे जेवण आहे’, यावर पत्नी पल्लवी जोशीने किस्सा सांगत म्हटले की, पहिल्यांदा वरणभात खाल्ल्यावर विवेकच्या चेहऱ्यावरील हावभाव हे अत्यंत विचित्र होते आणि त्याने यात मसाला कुठे आहे? असा प्रश्न विचारला होता. मात्र या सगळ्या गप्पांवर आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.
या संपूर्ण मुलाखतीपेक्षाही वरणभाताचा मुद्दा गाजत असून मराठी जेवणाला नावं ठेवण्याचा तुला कोणी हक्क दिला?, तुला आवडत नाही तर तू खाऊ नकोस, मराठी असूनही पल्लवीने हे कसं ऐकून घेतलं अशा प्रकारचे प्रश्न आता या व्हिडिओखाली युजर्स विचारताना दिसत आहेत, इतकंच नाही तर मराठमोळ्या काही कलाकारांनीही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता हे प्रकरण अजून पेटणार की इथेच थांबणार हे पहावं लागणार आहे.
The Bengal Files Trailer रिलीज, भारत, बंगाल आणि कत्तल, प्रत्येक सीन अंगावर शहारे आणणारा