जॅकी श्रॉफ यांना भाड्याने घ्यायचेय चाळीतलं 'ते' घर, पण मालक देतोय नकार; नेमकं कारण काय?
अभिनेते जॅकी श्रॉफ बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक… त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला. मुंबईतल्या ‘तीन बत्ती’ चाळीत जॅकी यांनी आपलं बरंच आयुष्य काढलं. जिथून त्यांच्या करियरची सुरुवात झाली त्या चाळीला जॅकी श्रॉफ अनेकदा भेटही द्यायला येतात. ज्या घरामध्ये ३३ वर्षे जॅकी श्रॉफ राहिले ते घर त्यांना आता भाड्याने द्यायचे आहे, अशी त्यांनी स्वत: इच्छा व्यक्त केली आहे.
मुंबईच्या ‘तीन बत्ती’ चाळीत जॅकी श्रॉफ त्यांच्या कुटुंबासोबत राहिले आहेत. त्याच घरात ते लहानाचे मोठे झाले असून अभिनयात यश मिळाल्यानंतरही ते अनेक वर्षे त्याच चाळीत राहिलेय. त्या चाळीतल्या घराबद्दलच्या भावना जॅकी यांनी मुलाखतीतून सांगितल्या आहेत. अलीकडेच जॅकी यांनी विकी लालवानीला मुलाखत दिली. तुम्ही चाळीतली तुमची खोली पुन्हा भाड्याने घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत का ? असा प्रश्न जॅकी यांना मुलाखती दरम्यान विचारला.
या प्रश्नावर जॅकी यांनी उत्तर दिले की, “हो मी प्रयत्न करत आहे, पण मला घरमालक ती खोली परत देत नाहीये. त्याला वाटतंय की जर त्याने मला ती खोली दिली तर… आणि मी त्याला म्हणतोय की, ‘अरे भावा, मी ती रुम घेऊन पळून जाणार नाही.’ तरीही तो मला ती खोली देत नाहीये. मी त्याला सांगितलं की, या खोलीचं भाडं मी देईन. सध्या त्या खोलीमध्ये ४ जणं राहत आहेत, ते जे भाडं देतायत तेच भाडं मी सुद्धा तुला देईन, पण तरीही तो मला खोली देण्यासाठी तयार होत नाहीये.”
अमृता सुभाष- अनिता दातेच्या ‘जारण’ ची बॉक्स ऑफिसवर किमया, तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिकची कमाई
जॅकी श्रॉफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ती चाळीतली रुम का सोडली या प्रश्नाचंही अभिनेत्याने उत्तर दिलं आहे. जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं की, “ती माझी खोली आहे. भावाच्या निधनानंतर आईने ती खोली सोडली होती. ती रुम सोडली असली तरीही मनात अजूनही कायम त्या जागेच्या आठवणी आहेत. खरंतर मला ती जागा जपायची आहे. तिथे काही वेळ घालवायचा आहे. त्या जागेची ऊर्जा मला अनुभवायची आहे. मी तिथे ३३ वर्षे घालवली आहेत. मला तिथले वातावरण खूप आवडते. मालक मला ती खोली देत नसला तरी मी कधीकधी तिथे जातो. संध्याकाळी बाल्कनीत मी उभा राहुन पान खातो.”