"तेव्हापासून एसटी मनात रुतली कायमचीचं...", 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्याने कार खरेदी केल्यानंतर भावूक पोस्ट
टेलिव्हिजन मालिकांचा चाहतावर्ग अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. ओटीटीचा वाढता कल पाहता मालिकेचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. २०१७ साली झी मराठीवर टेलिकास्ट झालेली ‘लागिरं झालं जी’ मालिकेची अजूनही प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम आहे. ही मालिका टेलिकास्ट होऊन आज जवळपास ८ ते ९ वर्षे झालेली आहेत. अजूनही मालिकेची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम आहे. अज्या- शितलीची लव्हस्टोरी आणि मालिकेतल्या इतर कलाकारांची लोकप्रियता या माध्यमातून मालिका मोठ्या प्रमाणावर हिट झाली.
‘घिबली’ ट्रेंडला प्रसिद्ध बॉलिवूड गायकाचा विरोध; म्हणाला, “फोटो बनवू नयेत आणि…”
मालिकेतल्या सहाय्यक कलाकारांच्या यादीमध्ये अनेक कलाकारांचा समावेश झाला आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे, अभिनेता राहुल मगदूम… अभिनेता राहुल मगदूमने गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन गाडी खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत आपल्या आयुष्यातील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. गाडी खरेदी केल्यावर राहुलने त्याच्या आयुष्यातील भावुक आठवणींना उजाळा देत चाहत्यांसह प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. नव्या गाडीचं राहुलने अगदी राजेशाही थाटात स्वागत केलं. या नव्या गाडीचे फोटो व व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये राहुल मगदूम म्हणतो, “माझ्या लहानपणापासून एस.टी.हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. प्रवास तर तोच असतो. पण एस.टी.च्या प्रवासात खूप आनंद व्हायचा. लहानपणी आई, बाबा बरोबर प्रवास करायचो माझे मोठे काका तर कोकणात मालवणमध्ये एसटी डेपोत ड्रायव्हर होते. त्यामुळे कोकणात लहाणपणापासूनच येण जाण व्हायचं. तेव्हापासून एसटी मनात रुतली कायमचीचं. पत्र्याचा खर खर आवाज, गियरची धडधड, काचेची कर कर पण खरचं निवांत झोप लागते लाल डब्यात आणि हे खरच आहे. अतिशयोक्ती अजिबात नाही. मला एसी स्लीपर ट्रॅव्हल्स मधे फार कमी झोप लागते. कारण माहीत नाही पण एसटीच्या त्या आवाजात काही तर अकल्पित, अनन्यसाधारण, जीवातलं काहीतरी होतं इतकंच सत्य. त्या प्रवासात सतत तोच तोच आवाज त्यामुळं झोप छान लागत असेल का? माहीत नाही. पण लागते. माझ्या जवळच्या मित्रांना हे सगळ माहित आहे. माझ्याकडे पोलो कार होती सेकंड हँड त्या जुन्या गाडीपेक्षा जास्त फिरलोय मी लाल डब्यातून. कधी कधी कार एसटी स्टँडला लावून पावसात एकटाच गेलोय कोकणात. ती माझी आवडती सोलो ट्रॅव्हलिंग आहे आणि ते मी कायम करत आलोय आणि करत राहू त्यात वेगळी मजा आहे. त्यात पण एक गंमत आहे. एक तर कोकण मला खूप प्रिय, तर कार पार्क केल्यानंतर, जिथं एसटी लागते. फलाट क्रमांकावर तिथं आल्या नंतर जी पहिली कोकणातील एसटी दिसेल त्यातून मी कोकणात भटकंती केलीय असो, जुन्या गाडीचा विषय थोडा वेगळाच होता.पण तिची साथ खरच अजूनही आठवते.माझ्यापेक्षा जास्त माझ्या मित्रांना. असो आज तुमच्या प्रेमामुळे आणि आई, वडिलांच्या आशिर्वादाने नवी गाडी घेतली. आता प्रवासात ए.सी. असेलच. लाल डब्यात धक्के लागायचे. घाम निघायचा पण सुखाची झोप लागायची. आता स्वतःच्या गाडीत किती झोप लागेल माहीत नाही. पण एसीमध्येही कष्टाचा घाम येऊदे इतकीच प्रार्थना….”