संतोष देशमुख प्रकरणावर मराठमोळ्या सेलिब्रिटींची पोस्ट; म्हणाले, “विकृताची परिसीमा आहे ही…”
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. मात्र या हत्येचं आजवर फक्त वर्णन केलं जात होतं. पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाहीत. सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये दाखल केले आहे, त्यामध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यावेळी हत्या करण्यात येत होती, त्यावेळेस त्यांचे व्हिडीओ काढले गेले. ते व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत.
‘रोजाच्या उपवासात जीम करणं म्हणजे…’, हिना खानवर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा निशाणा
या प्रकरणाचे पडसाद फक्त महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर, जनसामान्यांपासून मराठमोळ्या सेलिब्रिटींमध्येही उमटत आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. “न्यूज चॅनल वरील संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे फोटो पाहून अस्वस्थ व्हायला होतं. विकृतीची परिसीमा आहे ही… महाराष्ट्र असा नव्हता… दुःखद…” असं सचिन गोस्वामी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तर अभिनेता पृथ्वीक प्रतापने शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी केली आहे. अभिनेता शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतो, “मन सुन्न करणारे… मन हेलावून टाकणारे… संतापजनक फोटो… संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा…”अशी पोस्ट पृथ्वीक प्रतापने केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असून खंडणीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केला आहे. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही तीनही प्रकरणे एकत्र करुन ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून या घटना देशमुखांच्या हत्येच्या कटाचाच भाग असल्याचे यामध्ये म्हटले आहे. शिवाय या चार्जशीटमधले जे फोटो समोर आले आहेत त्यात वाल्मिक कराडसोबतचे संभाषणही नमूद करण्यात आले आहेत. तो कोणत्या मोबाइलवरून बोलत होता त्याचा ही उल्लेख करण्यात आला आहे.
मिका सिंगची शाहरुख विरोधात तक्रार, मागितलेली भेटवस्तू न दिल्याने नाराज
या हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराड, आरोपी दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, आठव्या क्रमाकांवर फरार कृष्णा आंधळेचा समावेश करण्यात आला आहे. नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. आता या हत्येचे फोटो समोर आले आहे. ते पाहिल्यावर अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाहीत. गंभीर बाब म्हणजे हत्या करताना आरोपी हसत होते. त्याचेही फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत.