
महाराष्ट्राचं कुलदैवत 'आई तुळजाभवानी' ची महागाथा दिसणार छोट्या पडद्यावर
‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘आई राजा उदो-उदो’, प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात गुंजणारा हा जयघोष. आई तुळजाभवानीच्या साक्षीने,तिच्या नित्य नामस्मरणाने अवघे मराठी विश्व रोजचा जगण्याचा श्वास घेते. इथल्या मातीतल्या माणसांची कुलस्वामिनी असलेल्या ‘आई तुळजाभवानी’ची महती अपरंपार आहे. ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका प्रेक्षकांना येत्या 3 ऑक्टोबरपासून रात्री 9.00 वाजता प्रेक्षकांना ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची पहिली झलक समोर आली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता मालिकेची प्रतीक्षा आहे. अभिनेत्री पूजा काळे या मालिकेत ‘आई तुळजाभवानी’चे पात्र साकारणार आहे.
बलाढ्य महिषासुराचा वध करणारी देवी तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आई आहे. मायेने जवळ घेणारी, लेकरांचा हट्ट पुरवणारी, योग्य मार्ग दाखवणारी आणि आपल्यावर संकट आलं तर त्वरित धावणारी अशा या ‘आई तुळजाभवानी’ची महागाथा लवकरच ‘कलर्स मराठी’ वाहिनी घेऊन येत आहे.
हे देखील वाचा: ‘नगं थांबू रं…’ प्रेरणादायी गाणे रिलीज, ‘पाणी’ चित्रपटातलं टायटल साँग पाहिलंत का ?
भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येत दुष्टांचा नाश करणारी देवी त्वरिता- तुरजा – तुळजा ते अपरंपार माया करणारी आई तुळजाभवानी हा प्रवास कसा घडला याची प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता असलेली गोष्ट या महागाथेत उलगडणार आहे.
अनेक असुरांचा संहार करत वेळोवेळी भक्तांचे रक्षण देवीने कसे केले,महिषासुर आणि देवीचे चाललेल प्रदीर्घ काळ युद्ध नेमके कसे लढले गेले. दैत्यमाता दीतीची महत्वाकांक्षा नेमकी काय होती, ही आजवर माहीत नसलेली गोष्ट उलगडणार आहेच पण त्याच बरोबर देवीला पृथ्वीतलावर साथ देणारे महादेव आणि पृथ्वीवर भक्त कल्याणात रममाण झालेली तुळजारुपातली पार्वती माता यांचे पतीपत्नीचे गोड गंमतीदार नातेही पाहायला मिळेल.
कधीच आई होऊ शकणार नाही हा देवी पार्वतींना असलेला शाप, ते त्यांचा “जगदजननी” जगन्माता हा सगळ्या विश्वाचे आईपण जपणारा प्रवास प्रत्यक्ष महादेवांना ही भावनिक करणारा होता. या शापाची आणि आईपणाची ही फारशी माहीत नसलेली मायेची गोष्ट या महागाथेची उत्सुकता वाढवणारी आहे. ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका रात्री 9.00 वाजता तर ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना रात्री 9:30 वाजता पाहायला मिळणार आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेबद्दल बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) – केदार शिंदे म्हणाले,”आई तुळजाभवानी’ ही फक्त मालिका नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक भक्ताच्या भक्तीचा सण आहे. अतिशय भव्य-दिव्य असणारी ही मालिका आहे.