“अखेर आज आमची इच्छा पूर्ण....”, संकर्षणने शेअर केला 'त्या' आजींसोबतचा भावूक व्हिडिओ...
मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने “नियम व अटी लागू…”, “कुटुंब किर्रतन” आणि “संकर्षण व्हाया स्पृहा…” या कार्यक्रमाच्या माध्यमातून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या संकर्षणने त्याच्या फॅन्ससोबतचा किस्सा शेअर केला आहे. सध्या अभिनेता “नियम व अटी लागू…” या नाटकामुळे कमालीचा चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग सुरु आहेत. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान आलेला अनुभव अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे.
अलीकडेच पुण्यामध्ये “नियम व अटी लागू…” नाटकाचा प्रयोग झाला. यावेळी अभिनेत्याला भेटण्यासाठी त्याच्या दोन चाहत्या आल्या होत्या. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर खास त्याच्या चाहत्यांसाठी पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने दोन चाहत्यांसोबतचा खास अनुभव शेअर केलेला आहे. पोस्टमध्ये संकर्षणने लिहिले की, “आज (११ जुलै) पुण्यात “नियम व अटी लागू…” प्रयोगाआधी २ आज्ज्या आल्या… दोघीही वयाने ८० आसपास असतील… मला वाटलं प्रयोगाला आल्या असतील… तर म्हणाल्या, “आम्ही वृद्धाश्रमात राहातो आम्हाला वेळत परत गेलं पाहिजे… आणि ३ तास आम्ही तब्येतीमुळे बसू शकत नाही पण तुला फक्तं भेटायला आलोय” भरभरून बोलल्या… आशीर्वाद दिले… आणि निघून गेल्या… फक्त भेटीसाठी ऑटोकरुन आल्या होत्या… मी मुद्दाम जातांना त्यांना माझ्या गाडीने पाठवलं… फार गोड वाटलं…”
संकर्षणला “नियम व अटी लागू…” नाटकाच्या प्रयोगाच्या इंटर्व्हल दरम्यान दोन आजी भेटायला आल्या होत्या. नाटक पाहण्यासाठी नाही, तर स्पेशली अभिनेत्याला भेटण्यासाठी त्या दोघीही आल्या होत्या. संकर्षणने त्या आजींसोबत गप्पा मारतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. संकर्षणने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्या आजी अभिनेत्याला म्हणतात की, “तुझ्या कविता खूप छान असतात, विशेषतः तुझी आईवरची कविता आम्हाला खूप आवडली. आम्हाला तुझ्या कविता खूप आवडल्या आहेत. ”असं त्या आजी म्हणताना दिसत आहेत. संकर्षणने त्यांना नाटक पाहण्यासाठी थांबता का असं विचाल्यानतंर त्यांनी आम्हाला उशीर होईल असं सांगितलं. परंतु, तेव्हा त्यांच्यासह आलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, “आमचं इथे जवळपास एक वृद्धाश्रम आहे, तिथल्या या आजी आहेत.”
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदतर्फे खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन
पुढे त्या दोघीही आजींनी सांगितलं की, “आम्हाला केवळ तुला भेटायचं होतं, कधीपासून आमची इच्छा होती. अखेर आज आमची इच्छा पूर्ण झाली. आता आम्हाला तुझं नाटक पाहण्याची फार इच्छा झाली आहे. ” व्हिडिओच्या माध्यमातून त्या दोन्हीही आजी अभिनेत्याला भेटण्यासाठी किती आतुर होत्या हे पाहायला मिळत आहे. अभिनेत्याला भेटल्यानंतरचा आनंद त्या दोन्हीही आजींच्या चेहऱ्यावरून स्पष्ट पाहायला मिळत आहे. संकर्षणने शेअर केलेला इन्स्टाग्रामवरील हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.