'सकाळी गरम चहा, चपाती, आयांच्या हातचं मटण, आता फक्त धावपळ'; बालपणीच्या आठवणींनी विशाखा सुभेदार व्याकूळ
टेलिव्हिजन अभिनेत्री विशाखा सुभेदारने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘शुभविवाह’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि अशा अनेक मालिकांतून विशाखाने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांत काम केले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या विशाखाने नुकतंच सोशल मीडियावर आपल्या भावाबद्दल खूप छान पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने माहेरपणाविषयी सुद्धा खूप छान आपलं मत मांडलं आहे, अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
भाऊबीजेदरम्यानचा भावासोबतचा फोटो पोस्ट करत विशाखाने पोस्ट लिहिली की, “अनेक वर्षांनी आमची भाऊबीज साजरी झाली… दादा दिवाळीला दुबईला असायचा कारण सर्व्हिस… यावर्षी मात्र सुट्टी आणि आमची भाऊबीज साजरी झाली… अचानक दोघांचे रंग जुळले… ट्युनिंग का काय म्हणतात तसं झालं… काल माहेरपण उपभोगलं. एक संपूर्ण दिवस… पूर्वी कसं लांबच्या गावात मुलगी दिलेली असायची… पोर माहेरपणाला आली की चांगलं महिनाभर रहायची… पण ते सुख जवळ लग्न होणाऱ्या पोरींच्या नशिबी फार कमी येतं… आमचं माहेरपण म्हणजे ७/८ तासांचं फारफार, लयं झालं तर चार दिवस… की आम्ही निघालो… अर्थात सासूबाई मागे लागायच्या, नवरा चल म्हणायचा असं काहीच नसायचं… आम्हालाच करमायचं नाही… आपण कधी एकदा आपल्या घरी जातोय असं वाटायचं.. “दिल्या घरी सुखी रहा..”
“पण खरंच असं खूपदा वाटतं सुट्ट्या काढून माहेरी जाता यायला पाहिजे… (आम्ही जायचो लहानपणी असे आईबरोबर, मावशीबरोबर) आपापल्या भाच्याबरोबर दुपारी झाडाखाली पत्ते कुटता यायला पाहिजे… सुट्टीत आलेल्या बहिणीच्या उवा काढता आल्या पाहिजेत… भाच्यांचे पाढे पाठ करून घेता आले पाहिजेत… चिंचा फोडता आल्या पाहिजेत, झोके घेता आले पाहिजेत, भांडी घासता घासता आयुष्य बोलता बोलता डोळ्यात पाणी यायला हवं आणि पुसायला बहिणीचा, आईचा पदर असायला हवा… हे सगळं माहेरपण आमच्या आया मावशींनी अनुभवलं… आम्हा बच्चे कंपनीचे लाड करता करता… सकाळी गरम गरम चहा-चपाती, दुपारी आयत गरम त्यांच्या त्यांच्या आयांच्या हाताचं मटण, चिल्लसखेळ, बांगड्या नाचे खेळ आणि पोतपोत गहू निवडून देऊन आईच काम कमी करणं हे सगळे दुपारचे उद्योग आणि रात्री अंगणात गप्पा भावांडाबरोबर आणि मग जायची वेळ यायची. तेव्हा आम्ही रडत गाड्या पकडायचो… काय गंमत होती… पूर्वीच्या शेणाने सारवलेल्या माहेराची.”
हे देखील वाचा – ‘वेलकम होम’ सिनेमा पाहायला का? सत्य घटनेवर आधारित चित्रपट
“आजही माहेरची ओढ कायम पण वेळ कमी… धावपळीच आयुष्य, प्रेम आहेच ते असणारच… पण गोंजारायला वेळ नाही… फक्त धावपळ… पण जवळ असल्याने कधीही पाच मिनिटासाठी का होईना आईकडे डोकावत येतं. आईला सुद्धा वाटलं यावंसं तर येता येतं, हेही तितकच खरं… मज्जा असते सणवारी आणि सुट्टी मिळाली तरच मज्जा आहे… थोडं विषयांतर झालं पण मनात आलं ते लिहित गेले… तर भाऊबीज… नानांनंतर आत्ता दादा… तुला खूप खूप प्रेम… ओढ कायम…”