
मॅजिक चित्रपटाचे टीझर लाँच
“मॅजिक” एक दरवळणारं मायाजाल; एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत दिसणार जितेंद्र जोशी !
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला चित्रपट
तुतारी व्हेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी याआधी बॉलीवूड, तमिळ चित्रपटांची निर्मिती केली असून “मॅजिक” या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पाऊल टाकले आहे. रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे.
केदार फडके यांनी छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, महेश कुडाळकर यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या प्रमुख भूमिकेत असून, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कसा आहे टीझर
“मॅजिक” चित्रपटाच्या टीजरमध्ये पोलिस स्टेशनमध्ये आपल्याच विचारांत गर्क असलेला जितेंद्र जोशी आपल्याला दिसतो. त्यानंतर त्याच्यासमोर एक मुलगी येते, पण ती त्याला धूसर दिसते असा हा टीजर आहे. मात्र, या दरम्यान त्याच्या मनातली घालमेल , भावभावना चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतात. पार्श्वसंगीत म्हणून वापर केलेली घड्याळाची टिकटिक अंगावर काटा आणते. त्यामुळे हा टीजर प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. “मॅजिक” दरवळणारं मायाजाल आता दिवसागणिक आपल्या अधिकाधिक जवळ येतंय. उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक असलेला “मॅजिक” मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी १ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
जितेंद्र जोशीची कमाल
बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा जितेंद्र जोशीचा अभिनय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. जितेंद्रच्या अभिनयाचे ‘मॅजिक’ पहायला नक्कीच प्रेक्षकवर्ग उत्सुक आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. जितेंद्र जोशीने कलाकार म्हणून नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांना न्याय दिला आहे आणि आता ही त्याची भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार की नाही याचा उलगडा जानेवारी १ तारखेलाच होईल.
पहा टीझर