
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत काही दिग्दर्शक आपली वेगळी ओळख निर्माण करतात. दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्त्रीमन समजून, त्यातील सूक्ष्म भावना, संघर्ष आणि सामर्थ्य मोठ्या पडद्यावर मांडण्यात केदार शिंदे यांचा हातखंडा आहे. ‘अगं बाई.. अरेच्चा!’पासून ‘बाईपण भारी देवा’पर्यंत त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने स्त्रीकेंद्री कथांना नवा आत्मा दिला आहे. स्त्रीमन समजून घेणारा दिग्दर्शक अशी ओळख असणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता मराठी प्रेक्षकांसाठी ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ च्या माध्यमतून एक वेगळी कथा घेऊन येत आहेत.
या नव्या चित्रपटातून ते पुन्हा एकदा तुमच्या आमच्या घरातील दोन महत्त्वाच्या स्त्रियांच्या म्हणजेच सासू-सूनेच्या नात्याचा वेध घेणार आहेत. हा चित्रपट केवळ सासू-सुनेच्या गंमतीजंमतीपुरता मर्यादित नसून, स्त्रियांच्या मनात चालणाऱ्या न बोललेल्या संवादाचा आरसा ठरणार आहे. या चित्रपटातून स्त्रियांची कोणती नवी बाजू उलगडणार आहे, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “हा चित्रपट करण्याआधी माझ्या मनात शंका होती की, प्रेक्षक म्हणतील पुन्हा तोच विषय. मात्र या चित्रपटाची कथा ऐकल्यावर हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. कारण, ही फक्त सासू सूनेची कथा नसून प्रत्येक महिलेची कथा आहे. मालिकांमध्ये सासू-सुनेचे वरवरचे नाते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात त्यांच्या आतल्या भावना, अपेक्षा, आणि नकळत प्रेम प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. अशी सासू-सुनेची गोष्ट याआधी पडद्यावर आलेली नाही. ‘अगं बाई.. अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते तितकेच प्रेम या चित्रपटालाही मिळेल, अशी आशा करतो.” असे ते म्हणाले आहे.
ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.