
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
30 ऑक्टोबर रोजी पवई येथील RA स्टुडिओमध्ये धक्कादायक घटना घडली. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने ऑडिशनसाठी बोलावलेल्या 17 लहान मुलांना ओलीस ठेवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर त्याच्या जवळ फायर गन आढळली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि त्याचा एन्काऊंटर केला, ज्यात रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे.
रोहित आर्याने काही मराठी सेलिब्रिटींनाही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. काही सेलिब्रिटींनी त्याच्या स्टुडिओला भेटही दिली होती. या घटनेच्या दोनच दिवस आधीच मराठी अभिनेता आयुष संजीव आरए स्टुडिओमध्ये गेला होता. तो रोहित आर्यालाही भेटला होता. इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्याने याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री रूचिता जाधव हिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली होती.
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
आता मराठी अभिनेता आयुष संजीवने देखील पोस्ट करत धक्कादायक माहिती दिली आहे. आयुषने लिहिलंय, “मी रोहित आर्याला दोन दिवसांपूर्वी भेटलो होतो. त्याने मला त्याचा आगामी ‘लेट्स चेंज ४’ या सिनेमात भूमिकेसाठी ऑफर दिली होती. त्यावेळी त्याने सिनेमाची जी कथा सांगितली होती आणि नंतर जी घटना घडली त्यामध्ये बरंच साम्य होतं. त्यामुळेच ही संपूर्ण घटना माझ्यासाठी एक मोठा धक्का होता. मी त्याला आधीपासून ओळखत होतो. ८-९ वर्षांपूर्वी मी त्याच्या सिनेमात काम केलं होतं. त्यामुळे मला त्याच्यावर शंका येण्याचं काहीच कारण नव्हतं. जे काही घडलं ते खरंच खूप धक्कादायक आणि गोंधळात टाकणारं आहे.”
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
आयुषने पुढे सांगितलं, “मी त्या वर्कशॉपमधल्या लहान मुलांनाही भेटलो होतो. त्यांच्यासोबत फोटोही क्लिक केले होते. सगळं काही एकदम नॉर्मल दिसत होतं. सुदैवाने सगळी लहान मुलं सुखरुप आहेत.” आयुषबरोबरच गिरीश ओक, उर्मिला कोठारे आणि इतर काही कलाकारांनीही रोहित आर्याच्या स्टुडिओला भेट दिली होती.