
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या वादाचा धूर निघत आहे, पण यावेळचा धमाका स्पर्धकांनी नाही तर स्वतः शोचे होस्ट रितेश देशमुखने केला आहे. ‘भाऊचा धक्का’ या विशेष भागात रितेश देशमुखने घरातील माहोल आणि धक्काबुक्की पाहून विशाल आणि ओमकार या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. रितेश भाऊंनी स्पष्ट केले की हा शो आता फक्त तरुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हा कार्यक्रम पाहतो.
अशा वेळी स्पर्धकांनी दाखवलेले हे वर्तन चुकीचा आदर्श देत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आपल्याकडे दोघे आहेत ज्यांना बोलण्यासाठी काहीच नाहीये का? फक्त मारामारी आणि स्वतः:च्या बॉडीचा, ताकदीचा प्रचंड माज आहे … एकमेकांच्या अंगावर धावून जायचं , धक्काबुक्की करायची, धमक्या द्यायच्या हेच आदर्श तुम्ही प्रेक्षकांना देणार का?” अशा शब्दांत रितेश भाऊंनी आपली नाराजी व्यक्त केली.
रितेश भाऊ म्हणाले, “विशाल आणि ओमकार, नीट ऐका. हे घर आहे, रस्त्यावरचा नाका नाही जिथे तुमची दादागिरी चालेल. लक्षात ठेवा, हे माझं घर आहे आणि इथे दादागिरी नाही, तर फक्त ‘भाऊगिरी’ चालणार!”
रितेश देशमुख यांनी ज्या पद्धतीने घरातील शिस्त जपण्याचा प्रयत्न केला आहे, ते कौतुकास्पद आहे. केवळ ओरडून नाही, तर अत्यंत संयमी पण कडक शब्दांत त्यांनी स्पर्धकांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. भाऊच्या धक्क्यावर काही जणांचे कौतुक तर काही जणांची रितेशने शाळा घेतली आहे. अजून काय काय घडले जाणून घेण्यासाठी बघा भाऊंचा धक्का…
तन्वी कोलते ‘तंटा क्वीन’
पहिल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख तन्वी कोलतेवर चांगलेच चिडलेले दिसत आहे. रितेश देशमुख म्हणाले, “तन्वी कोलते किती बोलते… तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!” तन्वीच्या वागण्यावर टीका करताना रितेश पुढे म्हणाले की, तिला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की मग रडायचं असतं. त्यांनी तिला स्पष्ट शब्दांत सुनावलं की, “तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे.” जेव्हा तन्वीने स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रितेश यांनी तिला “मी बोलतोय, थांब एक मिनिट” असं म्हणत गप्प केलं.