
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी आणि आर्या जाधव या दोघींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होताना चाहत्यांना दिसले आहेत. परंतु ते इतके जोरदार कधी झाले नाही. सध्या घरात नवीन कॅप्टन निवडण्यासाठी टास्क सुरू आहे. या टास्कमध्ये निक्की‘टीम ए’मध्ये तर, आर्या ‘बी टीम’मधून खेळत आहे. पुन्हा विरुद्ध संघांमध्ये खेळत असल्याने या दोघींमध्ये पुन्हा वाद झाले आहेत. मात्र, यावेळी या दोघींमधले वाद टोकाला गेले आहेत. या भांडणात निक्कीने थेट बिग बॉसकडे आर्याला घर बाहेर काढा अशी मागणी केली आहे.
निक्की आणि आर्यामध्ये झाला मोठा वाद निर्माण
‘बिग बॉस’कडून कॅप्टन निवडण्यासाठी घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिला गेला आहे. या टास्कमध्ये अंकिता, वर्षा, आर्या, निक्की आणि जान्हवी घराच्या वॉशरुममध्ये टास्कनुसार दिलेल्या स्टोनचं संरक्षण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, निक्कीच्या हातात हा स्टोन यावा अशी कोणाचीही इच्छा नसते. यामुळेच आर्या तिचे हात धरत असल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे. यानंतर दोघींमध्ये झटापटी होते. निक्की, “मला धरायचं नाहीये, स्टोनला उचलायचंय” असे आर्याला रागात सांगते. पण, शेवटी दोघीही एकमेकांचं ऐकून घेण्यास तयार नव्हत्या. यानंतर या दोघींमध्ये मोठे वाद होताना दिसले आहे.
निक्कीने आर्यावर घेतला आरोप
निक्की शेवटी रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन “बिग बॉस… हिने मला मारलंय आणि मी हे सहन करून घेणार नाही” असं जोरजोरात आरडाओरडा करत आणि रडत सर्वांना सांगत असते. एकीकडे निक्कीचा गोंधळ सुरू असताना आर्या अंकिताला “मला या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नाहीये. होऊ दे काय ते…गेली तर गेली घरी” असे म्हणते. निक्की तांबोळी रडत बाहेर गार्डन परिसरात निघून येते. तिच्या मागमोग अरबाज सुद्धा येतो. बाहेर बसून निक्की, “बिग बॉस…एकतर हिला घराच्या बाहेर काढा प्लीज… नाहीतर मला काढा” अशी थेट बिग बॉसकडे मागणी करते.
हे देखील वाचा- ‘इंकिंग अराउंड’! सईने मानेवर काढला नवा टॅटू, स्टोरी पाहून चाहत्यांचे वेधले लक्ष!
दरम्यान, आता या प्रकरणावर टास्कचा संचालक आणि ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याशिवाय भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख या दोघींना काय बोलणार याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.