(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट दिग्दर्शिका आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेकरता खास ठरत आहे. दिग्दर्शन, अभिनय अशी दुहेरी जबाबदारी ती सांभाळतेय. तरीही या चित्रपटाची आणखी खासियत म्हणजे मृण्मयीची बहिण गौतमी देशपांडे पहिल्यांदाच या चित्रपटासाठी गीतलेखन करत आहे. ‘मना’चे श्लोक चित्रपटातील नुकतंच प्रदर्शित झालेलं तिचं ‘तू बोल ना’ हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरतंय. एवढंच नव्हे, तर या चित्रपटात गौतमी अभिनयही करतेय. त्यामुळे देशपांडे भगिनी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.
दिग्दर्शिका, अभिनेत्री मृण्मयी म्हणते, “गौतमीने पहिल्यांदाच गाणं लिहिलं आहे, ही जबाबदारी तिच्यावर कशी पडली तर, यासाठी आम्ही अनेक पर्याय बघितले. परंतु अपेक्षित असे बोल मिळत नव्हते. चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये गौतमी आमच्यासोबत असल्याने तिने हे गाणं मी लिहून बघू का, असे विचारले. आम्ही हो म्हटले. ही जबाबदारी आम्ही गौतमीवर सोपवली आणि तिने ती आवडीने पार पाडली. आज जेव्हा या गाण्याला इतक्या छान प्रतिक्रिया येत आहेत, ते पाहून आम्हाला खूप आनंद मिळत आहे.”
‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये आदितीला दिला ‘या’ अभिनेत्यानं खास पाठिंबा
तर गौतमी देशपांडे आपल्या गाण्याच्या अनुभवाबद्दल म्हणते, “मी गीतकार नाही, परंतु पहिल्यांदाच गाणं लिहिण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा ताईच्या चित्रपटासाठी. यांचा जास्त आनंद आहे. गाण्याचे चित्रीकरण झाले असल्याने आणि गाण्याची ट्यून तयार असल्याने मला त्या अनुषंगाने गाणं लिहायचे होते. आम्हाला एक अशी हूक लाईन हवी होती, जी संगीतप्रेमींच्या मनात सहज, पटकन बसेल आणि ‘तू बोल ना’ हूक लाईन सगळ्यांना आवडली. मुळात मला चित्रपट काय आहे. कथा कशी पुढे जातेय, हे गाणं या कथेसाठी किती महत्वाचं आहे आणि ताईला काय अपेक्षित आहे, याची कल्पना असल्याने आणि मुख्य म्हणजे सौमिल आणि सिद्धार्थने बनवलेली ट्यून अतिशय सुंदर असल्याने मनापासून शब्द लिहावेसे वाटले. मी सौमिल, सिद्धार्थ आणि अर्थात ताईला या सगळ्याचे श्रेय देईन, कारण त्यांच्या विश्वासामुळेच मी गीतकार म्हणून माझं आयुष्यातील पहिलं गाणं लिहून शकले आणि रसिकांचा त्याचा खूपच छान प्रतिसाद मिळत आहे. ”
हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
‘मना’चे श्लोक’ १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून याचे लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. श्रेयश जाधव आणि संजय दावरा या चित्रपटाचे निर्माते आहेत. मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे.