
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
2025 मध्ये सर्वाधिक कमाई मराठी चित्रपट म्हणजे प्रभावळकरांचा दशावतार. दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या दशावतार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. कोकणाची पंरपरा दाखवत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार दशावतार प्रेक्षकांना भावला. याचित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुली मिस्त्रीच्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आले होते. आता दशावतार चित्रपट ऑस्कर गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
मराठी सिनेमासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. 98 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत या चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे. दशावतार चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. जगभरातील हजारो चित्रपटांतून निवडलेल्या गेलेल्या 150 चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे. याबाबत सुबोध खानोलकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिले,कष्टांचं, प्रामाणिकपणाचं, मोठं स्वप्नं पाहण्याचं चीज होतंच… फक्त कामावर विश्वास हवा, खाली मान घालून कष्ट करत राहण्याची चिकाटी हवी, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी आणि विश्वास ठेवणाऱ्या माणसांची खंबीर साथ हवी!
आज ‘दशावतार’ ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत (Main open film category – contention list) निवडला गेल्याचा मेल आला आणि गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली गेल्याचं समाधान मिळालं. हे समाधान फक्त ‘दशावतार’ निवडला गेलाय म्हणून नाहीये, तर आपला मराठी चित्रपट जागतिक स्तरावर तोडीस तोड उभा राहू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय म्हणून आहे…
मुख्य स्पर्धेच्या कॅटेगिरीत निवडला गेलेला ‘दशावतार’ हा बहुदा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हजारो चित्रपटातून जे १५०+ चित्रपट निवडले गेलेत त्यातला हा एकमेव मराठी चित्रपट आहे. आणि Academy Screening Room मध्ये दाखवला जाणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे!
जिंकणं हरणं नंतरची गोष्ट,पण मुख्य जागतिक प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणं हे प्रचंड अभिमानास्पद आहे!
ही फक्त सुरवात आहे, आम्ही सातत्याने चांगलं काहितरी तयार करण्याचा आणि ते जगासमोर आणून मराठीची मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू! प्रेम आणि आशीर्वाद असू द्या! अशा भावना त्यांनी पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. या सिनेमात दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदुलकर, महेश मांजरेकर, अभिनय बेर्डे यांच्या मुख्य भूमिका आहे.