(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेंस, मिस्ट्री या जॅानरची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून असाच एक रहस्यांनी भरलेला ‘असंभव’ हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये दिसणारी थरारक दृश्यं, गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट रहस्यपट असल्याचा अंदाज येतोय. मात्र या सगळ्यामागे नक्की काय रहस्य दडले आहे, याचा उलगडा येत्या २१ नोव्हेंबरलाच होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन सचित पाटील आणि पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी केले
मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे,प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नैनीतालच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये करण्यात आले होते. नैनितालमध्ये चित्रीत झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे.
मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटचे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिध्द अभिनेता, दिग्दर्शक सचित पाटील आणि प्रथितयश निर्माते नितीन प्रकाश वैद्य पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. तर एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर, संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत.
दिग्दर्शक सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री या चित्रपटाबद्दल म्हणाले की, ‘असंभव’ ही अशी एक कथा आहे, जी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल. यात थरार आहे, भावना आहेत, प्रेमकहाणी आहे आणि गूढतेने भरलेली रचना आहे. हा चित्रपट लोकांच्या मनात खोलवर उतरावा, यासाठी आम्ही प्रत्येक फ्रेमसाठी मेहनत घेतली आहे.” असे ते म्हणाले.
निर्माते नितीन प्रकाश वैद्य चित्रपटाबद्दल म्हणाले, “‘असंभव’ या चित्रपटाची संहिता ऐकताक्षणी ती खूप सकस असल्याचे जाणवले. कथा, पटकथा खूपच जबरदस्त असल्याने या चित्रपटाची निर्मिती आपण एकत्र करूया, असा आग्रह मी सचितला केला. पुढे आमच्या या प्रवासात उत्तम सहनिर्माते आणि तितकेच उत्तम तंत्रज्ञ सहभागी झाले. चित्रपट बनवताना कोणतीही तडजोड केली नसून सगळ्याच तांत्रिक बाबींवर खूप बारकाईने काम केले आहे. त्यामुळे खूपच दर्जेदार चित्रपट तयार झाला आहे आणि प्रेक्षकांच्या तो नक्कीच पसंतीस उतरेल, याची आम्हाला खात्री आहे.” असे नितीन प्रकाश वैद्य म्हणाले आहे.
‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रदर्शित, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी पहिल्यांदाच एकत्र
वळू ‘नाळ’, ‘गच्ची’, ‘अलिबाबा’ आणि ‘चाळीशीतले चोर’ ते ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या आगामी सिनेमाला लाभली आहे. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर अभिनेता सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तसेच निर्माते शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या यशानंतर हे ‘असंभव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. ‘नाच गं घुमा’ नंतर आता या चित्रपटापासून चाहत्यांना खूप आशा आहे.