
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत या वर्षात अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक चित्रपट रिलीज होऊन बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत. नवीन वर्षात देखील अनेक चित्रपट मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान शुभारंभाच्या मंगल क्षणी, श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ चा मुहूर्त शॉट पार पडला. या प्रसंगाने चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणी घेऊन ‘मर्दिनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत या चित्रपटाची कथा मनोरंजनाच्या पलीकडे, प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याची, सहनशक्तीची आणि शक्तीची गाथा उलगडते. या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांसाठी काहीतरी विशेष असणार आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात सुंदर आणि चमकदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
ज्यांच्या कामगिरीमुळे कथा अधिक प्रभावी आणि आठवणींमध्ये राहणारी बनेल. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या दमदार कलाकारांसह बालकलाकार मायरा वैकुळची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनुभवी कलाकारांची ताकद आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे ‘मर्दिनी’ हा चित्रपट आशय, अभिनय आणि सादरीकरणाच्या दृष्टीने एक वेगळा आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देईल. दिग्दर्शक अजय मयेकर यांचे या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे. तर दीप्ती तळपदे ह्या निर्मात्या आहेत. ‘मर्दिनी’ चित्रपट येत्या २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येणार आहे.
श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. यांच्या वतीने तयार होत असलेल्या ‘मर्दिनी’ या चित्रपटाच्या शूटिंगला कोल्हापूरमध्ये सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता स्वतः श्रेयस तळपदे असून, हा चित्रपट एका मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे. स्त्रीशक्तीवर आधारित आणि प्रेरणा देणारी कथा या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.