
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बालदिनाच्या दिवशी प्रत्येकालाच प्रत्येकाचे लहानपण आठवते, आणि यंदा ‘सन मराठी’वरील प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांनी त्यांच्या बालपणाच्या गोड आठवणी प्रेक्षकांसमोर मांडल्या. अनुष्का गीतेने शाळेतील नाटक, डान्स आणि क्रिकेटमध्ये केलेल्या धमाल आठवणी सांगितल्या, तर संकेत निकम यांनी गावातील शाळेतल्या निरागस खेळांचा अनुभव शेअर केला.
अशोक फळदेसाई :- (तुझ्यासाठी तुझ्यासंगं – तेजा )
माझं लहानपण गोव्यातील एका छोट्या गावात गेलं. त्यामुळे शाळाही छोटी होती. शाळेत चालत जाताना रस्त्यावर त्या त्या ऋतूला मिळणारी रान फळं दगडांनी पाडायची एक वेगळीच मजा होती. बालदिनाला आम्हाला खाऊ दिला जायचा त्यामुळे नक्की बालदिन का साजरा केला जातो हे जसं जसं मोठे होतं गेलो तेव्हा कळालं. आपलं वय वाढत जातं पण तरीही प्रत्येकात ते लहानबाळ दडलेलं असतं. मला जर पुन्हा बालपण जगायला मिळालं तर, मला क्रिकेटचं ट्रेनींग घेऊन क्रिकेट खेळायला आवडेल लहानपणी गावात तशी सोय नव्हती व इतर काही कारणांमुळे ती इच्छा अपूर्ण राहिली.
अनुष्का गीते:- (तुझ्यासाठी तुझ्यासंगं – वैदही)
शाळा म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता. रविवारी सुद्धा मला शाळेत जायला आवडायचं. याच कारण असं आहे की, मी कधीच लेक्चरला बसले नाही. नेहमीच डान्स, नाटक, जिमन्यास्टिक, क्रिकेट, भारूड अश्या असंख्य ऍक्टिव्हिटी मी करत असायचे. बालदिनाला खूप धमाल असायची दिवसभर आम्ही दंगा करायचो. दरवर्षी एक ऍक्टिव्हिटी असायची ज्यात आम्हाला मज्जा यायची. पुन्हा लहान व्हावं असा विचार नेहमीच मनात येतो. नुकतंच मालिकेत जत्रेचा सीन शूट झाला आणि तेव्हा असं वाटलं त्या प्रत्येक खेळण्यात बसावं वाटलं. माझ्यातील लहान मुलीला जपण्यासाठी मी अजूनही चॉकलेट खाते, कार्टून बघते. माझे घरात व सेटवर सुद्धा लाड होतात.
संकेत निकम:- (जुळली गाठ गं – धैर्य )
गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिकलोय त्यामुळे शाळेत लवकर जाऊन वर्गात झाडू मारणं, चटई टाकणं, मित्रांबरोबर खाऊ खाण्यासाठी २ रुपये जमवून आणणं असा दररोजचा उपक्रम असायचा. पुन्हा जर लहानपण जगायला मिळालं तर, मोबाईल पासून दूर प्रत्येक सण नव्याने पूर्वीसारख्या जल्लोषात साजरा करायला आवडेल. लहान मुलं खूप निरागस असतात आपण जसे मोठे होतो तसं निरागसपणा कमी होतो. त्यामुळे आजही मला तो निरागसपणा, खरं बोलायला, एकमेकांच्या खोड्या काढायला खूप आवडतात.
पायल मेमाणे:- (जुळली गाठ गं- सावी)
लहानपणापासून मी खूप गुणी मुलगी होते. आई अभ्यास घ्यायची आणि मी तिची प्रत्येक गोष्ट ऐकायची. शाळेतला एक किस्सा मला आठवतोय, स्नेहसंमेलनाला नाच रे मोरा या गाण्यावर डान्स बसवला होता. त्यात मलाच मोर बनवलं होतं. पण मला डान्स करायला आवडतो त्यामुळे मी आईला शाळेत घेऊन गेली. तेव्हा मग टीचरने मला मोर न बनवता डान्स ग्रुप मध्ये पाठवलं. प्रत्येकवेळी आपण मोठे झालो आहोत म्हणून आपल्या मनातील भावना बरेचदा दाबून ठेवतो. त्यामुळे लहानपणी जसं पण रोखठोक राहायचो तसंच राहील पाहिजे. पुन्हा एकदा लहानपण जगायची संधी मिळाली तर कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवून धमाल करेन.
Ranvir Singh:‘राम-लीला’ला 12 वर्षे पूर्ण; रणवीरचा ‘राम’ अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत
वैभव कदम:- (इन्स्पेक्टर मंजू – सत्या)
शाळा म्हणजे धमाल असायची, नेहमीच बेंचवर बसून खिडकीत पाहताना बाहेरच्या जगात कधी जाणार असे प्रश्न पडायचे. पण आता पुन्हा एकदा शाळेत जावं वाटतं. शाळेत खूप छान पद्धतीने बालदिन साजरा व्हायचा. विविध खेळ, चित्रकला, नृत्य स्पर्धा, भाषण असा उपक्रम असायचा. लहानपणी प्रत्येक जण मनात जे काही येईल ते करून मोकळं व्हायचे पण मोठेपणी प्रत्येक व्यक्तीचा विचार करावा लागतो. त्यामुळे ती आपली निरागस बाजू मी खूप मिस करतोय.
मोनिका राठी – (इन्स्पेक्टर मंजू – मंजू )
लहानपणापासून मी खूप शांत आहे पण माझ्या जवळचे मित्र मैत्रणी, फॅमिली यांच्यासोबत माझी मस्ती सुरु असते. शाळेत बालदिनाला खाऊ दिला जायचा. वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या तो दिवस फक्त धमाल करायची हे ठरलेलं होतं. आज जर पुन्हा लहानपण जगायला मिळालं तर शाळेतील धमाल, मस्ती पुन्हा अनुभवायला मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालावेन. शूटिंगमुळे बऱ्याच आवडीच्या गोष्टी करायला वेळ नाही मिळत त्या सगळ्या गोष्टी नव्याने जगेन. प्रत्येकाने स्वतःमधलं लहानमुल कायम जपायला हवं.