
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
महाराष्ट्राच्या कविविश्वात विनोदी काव्यसादर करून वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज निधन झाले आहे. आज (शुक्रवार, 28 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजता अमरावती येथे दीर्घ आजारामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते वयाच्या ६८ वर्षांचे होते आणि चाहत्यांचे आवडते कवी होते. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर अनेक दिवस अमरावतीत उपचार देखील सुरू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या जाण्याने चाहते निराश झाले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज – माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या ते अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाच्या घरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, आणि दोन सुसंस्कृत कन्या महाजबी आणि हुमा असे त्यांचे संपूर्ण कुटुंब आहे. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात दुपारी दोननंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
साहित्य क्षेत्रातील तेजस्वी, हसरे व्यक्तिमत्व डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे महाराष्ट्रात आणि विशेषत: विदर्भ-मराठवाडा परिसरात कविसंमेलनांचे आकर्षणबिंदू होते. त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेली ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल महाराष्ट्रभरात अतिशय लोकप्रिय झाली. त्यांनी 6 हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली असून, त्यांच्या नावावर 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यांच्या सादरीकरणाची खुमासदार भाषा, तुफानी विनोद, ग्रामीण बोलीतील पोट धरून हसवणारे किस्से, आणि सामाजिक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करणारी शैली त्यांची खास ओळख आहे.
कियारा आणि सिद्धार्थने दाखवली आपल्या लाडक्या लेकीची पहिली झलक, नाव देखील केले जाहीर
डॉ. मिर्झा यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५७ रोजी झाला. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी कविता लेखनाची सुरुवात केली, तर १९७० पासून ते मंचावर काव्य सादरीकरण करू लागले. पुढील ५० वर्षे ते विदर्भ आणि मराठवाड्यातील कविसंमेलनांचे तेज बनून राहिले. शेती, माती, ग्रामीण भाग, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विसंगती, सामाजिक समस्यांवरील हलक्या-फुलक्या, पण अचूक अशा नर्म विनोदी शैलीतील लेखन त्यांच्या लोकप्रियतेचे गमक ठरले. मराठी, वन्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्या कार्यक्रमांनी वन्हाडी भाषेची महती देशभर झाली. मोठा माणूस, सातवा महिना, उठ आता गणपत, जांगडबुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या. जांगडबुत्ता या शब्दाचे ते जनक आहेत