
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी ZEE5 ने आज त्याच्या आगामी मराठी ओरिजनल सिरीज Devkhel (देवखेळ) चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. कोकणातील फारशा ऐकिवात नसलेल्या लोककथांपासून प्रेरित, देवखेळ हा एक गहन मानसशास्त्रीय थरारपट आहे. जो शिमगा (होळी) सणाच्या भीतीदायक पार्श्वभूमीवर परंपरा, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी यांची सरमिसळ करतो. ही सिरीज येत्या 30 जानेवारीपासून ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे. तसेच ही वेब सीरिज प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवताली किनारपट्टीवरील गावावर आधारित, देवखेळ एका थरारक रहस्यावर आधारित आहे. दरवर्षी होळी पौर्णिमेच्या रात्री, एखाद्याचा मृत्यू होतो. हे मृत्यू न्यायाचे प्रतीक म्हणून स्थानिक पातळीवर पूजल्या जाणाऱ्या शंकासुर या पौराणिक लोककथा व्यक्तिरेखेनेने दिलेल्या दैवी शिक्षेची कृत्ये आहेत, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. ट्रेलरमध्ये अशा जगाची झलक दाखवण्यात आली आहे, जिथे श्रद्धा तर्कशक्तीवर मात करते. भीती ही शांततेला अधोरेखित करते आणि सत्य विधीत दडलेले असते. जेव्हा इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे गावात येतो, तेव्हा तो अंधविश्वासाला स्पष्टीकरण म्हणून स्वीकारण्यास नकार देतो. ही काळजीपूर्वक लपवून केलेली हत्या असल्याचे त्याचे मत असते. त्याचा तपास सुरू करतो. या मालिकेत इन्स्पेक्टर विश्वास सरंजामेच्या भूमिकेत अंकुश चौधरी असून प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, अरुण नलावडे, वीणा जामकर आणि मंगेश देसाई यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत.
या वेब सीरिजचे दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड म्हणाले, “देवखेळचा जन्म शंकासुर लोककथा परंपरेबद्दलच्या आकर्षणातून झाला – एक विश्वास प्रणाली जिथे न्यायाकडे संस्थात्मक नाही तर दैवी म्हणून पाहिले जाते. आघात, श्रद्धा आणि भीती ह्यामुळे मानवी मनाचे रुपांतर मिथकात कसे होऊ शकते, हा शोध ही सिरीज घेते. ही केवळ एक गुन्हेगारी कथा नाही, तर एक भावनिक आणि मानसिक प्रवास आहे. मराठी ZEE5 ने ही कथा प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे सांगण्यासाठी परिपूर्ण व्यासपीठ उपलब्ध केले. प्रेक्षकांनी ती अनुभवावी यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
‘हिंदू धर्म स्वीकारा, काम मिळेल…’ अनुप जलोटा यांनी ए.आर. रहमानला दिला सल्ला; गायकाचा राग अनावर
इन्स्पेक्टर विश्वास सरंजामेची भूमिका साकारणारा अंकुश चौधरी म्हणाला, “देवखेळ हा सिनेमा रहस्यापेक्षा खूप जास्त आहे – तो विश्वास आणि तर्क यांच्यातील संघर्ष आहे. विश्वास सरंजामे हा तर्कशास्त्र, पुरावे आणि कायद्यात खोलवर रुजलेला माणूस आहे. तरीही त्याला जिथे भीती, श्रद्धा आणि शतकानुशतके जुन्या अंधश्रद्धा लोकांच्या निवडी ठरवतात, अशा ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाते. ‘दैवी’ मुद्यावर प्रश्न उपस्थित करण्यास नकार देणाऱ्या व्यवस्थेमुळे भावनिकदृष्ट्या प्रभावित होऊन वस्तुनिष्ठ राहणे. मला अंतर्गत संघर्षाने सर्वात जास्त आकर्षित केले. कोकणातील वातावरण, शंकासुराची पौराणिक कथा आणि मानसिक तणाव या सिरीजला अविश्वसनीयपणे ‘हटके’ बनवतात.”
या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी प्राजक्ता माळी देखील म्हणाली, “देवखेळ वेड लावणारा आहे. कारण आपण ज्यावर क्वचितच प्रश्न विचारतो, अशा वास्तवाला प्रतिबिंबित करतो – विश्वास, भीती, शांतता आणि अगदी अपराधीपणा किती खोलवर असतात. मी ज्या गोष्टीने प्रोजेक्टकडे आकर्षित झाले ते म्हणजे त्याची भावनिक सखोलता आणि सांस्कृतिक प्रामाणिकता! कथा अशा जगात उलगडते जिथे विधी, उत्सव आणि भीती एकत्र राहतात. माझी व्यक्तिरेखा त्या नाजूक संतुलनात राहते. तिला पदर आहेत. ती भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची आणि परंपरा, न सांगितलेल्या सत्यांच्या वजनाने आकारलेली आहे.”