
फोटो सौजन्य - Social Media
मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख देणारा महत्त्वाचा टप्पा गाठत ‘गोंधळ’ हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट आशय, सादरीकरण आणि तांत्रिक बाजू यांमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. आता या चित्रपटाने एक ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल सात भाषांमध्ये शंभर टक्के व्हिज्युअल डब होणारा जगातील पहिला चित्रपट ठरण्याचा मान मिळवला आहे.
‘गोंधळ’ मराठीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, व्हिज्युअल डब या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ आवाजच नव्हे, तर पात्रांच्या ओठांच्या हालचाली देखील संबंधित भाषेनुसार अचूक जुळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांना हा चित्रपट अधिक नैसर्गिक आणि जवळचा वाटणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचे तंत्रज्ञान मर्यादित स्वरूपात वापरले गेले असले, तरी ‘गोंधळ’मध्ये ते शंभर टक्के वापरले गेले आहे, हीच त्याची खासियत आहे.
या चित्रपटाची कथा ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असून, महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीशी जोडलेली आहे. परंपरा, भावना आणि सामाजिक वास्तव यांची सांगड घालत हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. प्रभावी सिनेमॅटोग्राफी, दमदार कथानक आणि वास्तववादी मांडणी यामुळे ‘गोंधळ’ने देश-विदेशातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप पाडली आहे. विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या चित्रपटाने आता Academy Awardsसाठी भारताकडून अधिकृत प्रवेश मिळवण्यासाठीच्या स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे.
या चित्रपटाच्या तांत्रिक प्रक्रियेसाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. व्हीएफएक्स आणि एआयच्या मदतीने प्रत्येक फ्रेममध्ये सूक्ष्म बदल करून प्रेक्षकांना वास्तववादी अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही एक मोठी झेप मानली जात आहे.
नुकतेच रवींद्र नाट्य मंदिर येथे तसेच बंगळुरूतील सुचित्र फिल्म सोसायटीमध्ये या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे ‘गोंधळ’च्या जागतिक प्रवासाला आणखी बळ मिळाले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले की, ‘गोंधळ’ हा आपल्या मातीचा, संस्कृतीचा आणि भावनांचा प्रामाणिक प्रवास आहे. हा चित्रपट विविध भाषांमधून जगभर पोहोचणार असल्याने महाराष्ट्राची परंपरा आणि लोककला अधिक व्यापक स्तरावर पोहोचेल, असा त्यांचा विश्वास आहे. व्हिज्युअल डब तंत्रज्ञानामुळे प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांना तो त्यांच्या स्वतःच्या भाषेत अनुभवता येईल आणि त्याच भावनेने ते कथेशी जोडले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर आणि ऐश्वर्या शिंदे यांसारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपटाला बळ दिले आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज इलैयाराजा आणि अजय गोगावले यांच्या संगीतामुळे चित्रपटाला विशेष उंची लाभली आहे. दरम्यान, ‘गोंधळ’च्या सर्व भाषांतील डायलॉग प्रोमो एप्रिल महिन्याच्या अखेरीस युट्यूबवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच, ‘गोंधळ’ हा केवळ एक चित्रपट नसून मराठी संस्कृतीचा जागतिक प्रवास ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.