
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आपल्या मराठी संस्कृतीचा आणि श्रद्धांचा अविभाज्य भाग असलेला म्हणजे ‘गोंधळ’. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजरा होणारा एक पारंपरिक विधी आणि हाच पारंपरिक गोंधळ आता रुपेरी पडद्यावर अवतरतो आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘गोंधळ’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला आहे. मोठ्या कलाकारांच्या उपस्थितीत थाटात हा कार्यक्रम पार पडला आहे. या सोहळ्यात खऱ्या अर्थाने गोंधळ घालण्यात आला. पारंपरिक वाद्यांचे नाद, नृत्य, आणि मंत्रोच्चारांनी वातावरण भारून गेले होते. या पारंपरिक सादरीकरणाने लाँच सोहळ्याला एक आगळं-वेगळं सांस्कृतिक स्वरूप पाहायला मिळालं आहे.
प्रेक्षकांच्या मनात आधीच उत्सुकता निर्माण झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ट्रेलरमध्ये कथानकात काहीतरी गूढ असल्याचे समजले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा काहीतरी सांगतेय आहे. त्यामुळेच चित्रपटाची उत्कंठा अधिक वाढली आहे. भव्य सादरीकरण, प्रभावी सिनेमॅटोग्राफी, तांत्रिक उत्कृष्टता आणि संस्कृतीशी घट्ट नातं सांगणारं कथानक, या सर्व बाबींमुळे ‘गोंधळ’ आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिनेमा ठरणार, असा विश्वास प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
ट्रेलरमधून पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक मांडणीचा अप्रतिम संगम दिसतो आहे. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलगडणारी ही कथा काहीतरी अनपेक्षित आणि रहस्यमय वळण घेऊन येत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडेल ही आशा आहे.
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक संतोष डावखर याबद्दल म्हणाले, ” ‘गोंधळ’ म्हणजे आपल्या मातीतली आणि संस्कृतीतली कहाणी आहे. आत्मा, लोककलेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम यात प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, परंपरा आणि विधींना आम्ही एका नव्या दृश्यात्मक रूपात मांडण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटामागे एक समर्पित आणि कल्पक टीम कार्यरत आहे. प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक सूर हा आपल्या संस्कृतीचा स्पंदन अनुभवायला लावेल. ‘गोंधळ’ प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नाही, तर एक भावनिक आणि भव्य अनुभव देईल, जो मनात बराच काळ रुंजी घालेल, याची मला खात्री आहे.”
काय ‘बिग बॉस १९’ होस्ट करण्यासाठी सलमान खानने घेतले १५०-२०० कोटी रुपये? निर्मात्यांनी केला खुलासा
चित्रपट आपल्या मातीतील असून टिझर, ट्रेलर पाहून हा चित्रपट नेमका काय आहे, याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यामुळे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे ‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले आहे. तर, चित्रपटाची सहनिर्माती दीक्षा डावखर यांनी केली आहे. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘गोंधळ’ हा चित्रपट येत्या १४ नोव्हेंबर रोजी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.