मिलिंद गवळींची वडीलांच्या वाढदिवशी खास पोस्ट, बाबांकडे केली एक महत्वाची विनंती
स्टार प्रवाह वाहिनीवर टेलिकास्ट झालेली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्धच्या भूमिकेतून अभिनेते मिलिंद गवळी प्रसिद्ध झाला. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अभिनेता महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झाला. गेल्या काही दिवसांपूर्वीच मलिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्याने वडिलांचे कौतुक करत त्यांच्याकडे एक विनंती केली आहे.
“अभिषेक आणि ऐश्वर्या स्वभावाने परस्पर विरोधी…” ‘कुछ ना कहो’फेम अभिनेत्री जरा स्पष्टच बोलली
वडीलांच्या वाढदिवशी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता मिलिंद गवळी म्हणतो,
“पप्पा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… आज तुम्ही ८५ वर्ष पूर्ण केले, माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभू देत आणि तुमच्या आवडत्या समाजकार्यासाठी तुम्हाला अजून खूप ऊर्जा, शक्ती, आणि यश मिळू देत. मला माहिती आहे तुम्हाला यश मिळो व न मिळो तुमचं कार्य सतत प्रामाणिकपणे चालू असतं, सतत कामात व्यस्त राहणे, सतत दुसऱ्याला मदत करत राहणे, पोलीस खात्यातून रिटायर्ड झाल्यानंतर, तुम्ही रिटायरिंग करून घेतलं, गाडीला जसे नवीन टायर लावून परत ती वेगाने धावायला लागते. तसेच इतकी वर्ष पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा तुम्ही दुप्पटीने काम केलं आहे. असंख्य लोकांना मदत केली आहे, अनेक कुटुंबाचे कल्याण केलं आहे, समाजातल्या तळागाळातल्या कोणीही तुमच्याकडे मदतीचा हात मागितला आणि तो निराश होऊन परत गेला असं कधी झालं नाही.”
“पोलीस खात्यातले अधिकारी खूप गर्विष्ठ आणि अहंकारी मी पाहिलेले आहेत, पण तुम्ही सहाय्यक पोलीस आयुक्तच्या पदावर असताना सुद्धा कधीही गर्व केला नाही किंवा हाता खालच्या लोकांवर अधिकार गाजवला नाही, एवढ्या मोठ्या हुद्द्यावर राहून इतरांना आपण कशी मदत करता येईल हेच सातत्याने बघत आलात. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर सुद्धा इतक्या वर्षांनी आजही लोक तुम्हाला मान देतात, आजही लोकांचा तुमच्यावर जीव आहे, मला असंख्य लोकं भेटतात आणि तुमच्याविषयी अतिशय प्रेमाने आणि आधाराने बोलतात तेव्हा माझी प्रेमाने छाती भरून येते, सतत मी किती भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे वडील लाभले. माझ्याही आयुष्याची ही वाटचाल तुमच्या आधाराशिवाय होऊ शकली नसती, तुम्ही कायम माझे हिरो राहिला आहात, तुमच्या इतकं काम मी आयुष्यात करू शकणार नाही हे मला लहानपणीच कळलं होतं, पण आजही तुमच्यामुळे खूप काम करायची ऊर्जा सतत मिळत असते.”
“तुमच्यामुळे आजही प्रामाणिक काम करायचा प्रयत्न करत असतो, तुम्हाला आनंद मिळावा आणि तुम्हाला माझा अभिमान वाटावा म्हणून माझी सतत धडपड चालू असते. माझे वडील सतत काम करत राहणारी व्यक्ती (workaholic) आहे, असं मी सतत सगळ्यांना सांगत असतो, पण आज तुमच्या ८५ व्या वाढदिवसाच्या एक विनंती करावीशी वाटते, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही नक्की करा, पण या सगळ्या धावपळीमध्ये, स्वतःची काळजी पण घ्या, स्वतःच्या तब्येतीला जपा, पप्पा कधीतरी स्वतःसाठी पण जगा. आय लव्ह यू आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”