शरद उपाध्ये- निलेश साबळे वादावर किरण मानेंची पोस्ट; म्हणाला, "टीकाकारांना उंच कोलून टाक आणि म्हण…"
सध्या सोशल मीडियावर अभिनेता निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरु आहे. याचं कारण ठरलं, नुकतंच ‘चला हवा येऊ द्या २’चा होस्ट बदली झाल्याचे वृत्त आहे. ‘चला हवा येऊ द्या’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या शहराशहरांत नवख्या कलाकारांसाठी ऑडिशन सुरु आहे. मात्र आता शोचे सूत्रसंचालन निलेशऐवजी अभिजीत खांडकेकर करणार असल्याचे वृत्त आहे.
या वृत्तावर बुधवारी शरद उपाध्ये यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करत ‘निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेली’, ‘त्याने सेटवर माझ्याकडे दुर्लक्ष केलं’, अशा शब्दांत निलेश साबळेवर टीका केली होती. याच टीकेला प्रत्युत्तर म्हणून निलेशने गुरुवारी एक व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं. यावेळी निलेशने सविस्तरपणे त्याची बाजू मांडली. त्यानंतर शरद उपाध्येंनी केलेल्या आरोपांचं सुद्धा खंडन केलं. सध्या सोशल मीडियावर निलेशच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी बोलताना दिसत आहेत.
‘कौन बनेगा करोडपती’शो ला २५ वर्षे पूर्ण, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली खास पोस्ट…
मराठमोळा अभिनेता किरण मानेंनी निलेश साबळेच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने निलेशच्या समर्थनार्थ म्हणतात की, “निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत, प्रामाणिकपणा आहे, कामावरची निष्ठा आहे. ‘इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’,असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची???
तुकोबाराया सांगून गेले आहेत,
“सांगो जाणती शकुन। भूत भविष्य वर्तमान ।।
त्यांचा आम्हांसी कंटाळा। पाहो नावडती डोळां।।”
कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करियरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा. जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक… आणि म्हण, “ए चल… हवा येऊ दे” खुप शुभेच्छा मित्रा.”