राजकीय षडयंत्र अन् प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं कथानक; Raid 2 चा जबरदस्त ट्रेलर रिलीज...
अखेर, बहुप्रतिक्षित अजय देवगण (Ajay Devgn) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) स्टारर ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये अजय पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमय पटनाईकाची भूमिका साकारणार आहे. तर रितेश देशमुख शक्तिशाली राजकारणी दादाभाईच्या भूमिकेत दिसणार असून तो एका अत्यंत शक्तिशाली आणि भ्रष्ट राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेशचे चित्रपटामध्ये निगेटिव्ह पात्र असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अखेर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा आता ट्रेलर रिलीज झाला आहे.
चित्रपटातल्या सर्वच कलाकारांनी आपआपल्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केलेला आहे. दरम्यान, ट्रेलरमधील अजय देवगणचा नायक आणि रितेश देशमुखचा खलनायक अवतार पाहून सिनेरसिकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण झाली आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘रेड’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे, तब्बल ७ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर ‘रेड २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २ मिनिट ३४ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अमय पटनाईक लखनऊच्या दादाभाईच्या घरी पोहोचले आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत प्रत्येक सीन्स प्रेक्षकाला खुर्चीसोबत खिळवून ठेवतो. थरारक दृश्यांनी सुरुवात झालेल्या ट्रेलरमध्ये अमय पटनायक एका मोठ्या ‘रेड’ साठी सज्ज झालेला दिसतो.
सर्वाधिक काळ चाललेली ही ‘रेड’ तब्बल ४२०० कोटींच्या एका महाघोटाळ्याभोवती फिरताना दिसते. ट्रेलरमध्ये, एका सत्ताधारी राजकीय नेत्याचा काळा कारभार उघडकीस आणण्याचे आव्हान आयआरएस अधिकारी अमय पटनायकसमोर आहे. रितेश देशमुखने साकारलेला खलनायक ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधून घेतो. त्याचा धूर्त आणि कपटी स्वभाव, त्याने आपली बेनामी संपत्ती लपवण्यासाठी वापरलेल्या युक्त्या आणि अजय पटनायकला दिलेले थेट आव्हान. यामागील त्याचे राजकीय षडयंत्र, हे सर्व ‘रेड’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना कथेसोबत खिळवून ठेवण्यास पुरेसं आहे. आयआरएस अधिकारी अमय पटनाईक धूर्त आणि कपटी स्वभावाच्या दादाभाईच्या घरातून कशापद्धतीने बेनामी संपत्ती बाहेर काढतो ? हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
दरम्यान, अजय देवगणने इन्स्टाग्रामवर ट्रेलरचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “एक तरफ सट्टा, दुसरी तरफ सच – यह रेड अब और बडी हो चुकी है…” ‘रेड २’ मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यासोबत वाणी कपूर, सौरभ शुक्ला, राजत कपूर, सुप्रिया पाठक आणि अमित सियाल यांसारख्या कसलेल्या कलाकारांची तगडी फौज प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा राज कुमार गुप्ता यांनी केले आहे, ज्यांनी पहिल्या भागाचेही दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजचे भूषण कुमार, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी संयुक्तपणे केली आहे. ‘रेड’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता त्या प्रमाणेच प्रतिसाद ‘रेड २’लाही मिळतो का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अनेकजण तर, ‘रेड २’ चित्रपट हिट होणार अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
“कुत्रे आहेत, भुंकणारंच…”, गोविंदाबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनीता आहुजा कोणावर भडकली?