(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली असून, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरनंतर आता चित्रपटाचा ट्रेलर एक भव्य सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला आहे.या चित्रपटाची घोषणा यंदा महाराष्ट्र दिनी करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला.ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांचं आणि त्यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचं कौतुक केलं.
या ट्रेलर लॉन्च प्रसंगी राज ठाकरे म्हणाले, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा ट्रेलर पाहताना एक विचार मनात आला, महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला २’ महेश मांजरेकरांवरच बनवायला हवा! कारण महेश खरंच झपाटलेला आहे. तो कधीही भेटला की, एखाद्या नव्या सिनेमाबद्दलच बोलतो. तेही केवळ सिनेमा नाही तर त्यामागे एक वेगळा विचार, समाजभान घेऊनच येतो. आणि त्याचं स्वप्नंही मोठं असतं. हेच गुण आमच्यातही समान आहेत.आम्ही जे पाहतो, ते नेहमी भव्य पाहतो!”
पुढे राज ठाकरे म्हणाली की,“‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा पहिला सिनेमा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरांसाठी होता; पण तो ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा सिनेमा ग्रामीण महाराष्ट्रासाठीचा आहे. त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे सिनेमे घडत नाहीत. शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येबद्दलचा विषय अशा प्रकारे मांडणं हे एक वेगळंच धाडस आहे आणि वेगळा विचार आहे. हा विचार महेश नेहमीच करत असतो.”
त्यानंतर ते महेश मांजरेकरांचं कौतुक करीत म्हटलं, “मी मागे एकदा म्हटलं होतं की, हिंदी चित्रपटसृष्टीत यश चोप्रा आहेत; तसं मराठीत महेश मांजरेकर आहेत. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा सिनेमाला महाराष्ट्रातून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असे अनेक सिनेमे आले, ज्यांना प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. ते सिनेमे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ऐतिहासिक सिनेमे होते. पण महेश ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय’च्या निमित्ताने वर्तमान आणि भूतकाळावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली मराठी जनता हा सिनेमा डोक्यावर घेईल, असं मला वाटतं. महेश, सिनेमातले कलाकार आणि सगळ्याच टीमला माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा.”