फोटो सौजन्य - Social Media
आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शना पासूनच त्याला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. नातेसंबंधातील बारकावे सांगताना एका वेगळ्या आणि हटके संकल्पनेवर आधारित हा सिनेमा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावतो आहे. महाराष्ट्राची ‘लय भारी’ जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांनी चित्रपटातील ‘क्यूट कपल’चे कौतुक करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमधील सुभाष घई, गजराज राव यांसारख्या नामवंत कलाकारांनी आणि समीक्षकांनीही चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
या चित्रपटाचा विषय नातेसंबंधांतील ‘टाईम शेअरिंग’ या संकल्पनेवर आधारित आहे, जी आजवर फारशी हाताळली गेली नव्हती. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी मुख्य भूमिकेत प्रभावी अभिनय साकारला आहे. त्यांच्यासोबत निवेदिता सराफ, गिरीश ओक आणि सुकन्या मोने, संजय मोने यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या सदाबहार अभिनयाने कथेला अधिक बळकटी दिली आहे.
चित्रपटाची मांडणी, कथानक, आकर्षक गाणी आणि दिग्दर्शनातील ताजेपणा यामुळे सिनेमागृहात प्रेक्षक एकीकडे खळखळून हसताना दिसतात तर काही प्रसंगांत त्यांच्या डोळ्यांत पाणीही येते. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांना भावनिक तसेच मनोरंजक अनुभव देतो आहे. सध्या ‘बिन लग्नाची गोष्ट’चे शोज हाऊसफुल होत असून, अनेक ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी दिसून येत आहे.
गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांनी लिहिली आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी नात्यांवरील ही हृदयस्पर्शी कथा पडद्यावर साकारताना प्रेक्षकांच्या मनात घर करून दाखवले आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयामुळे हा सिनेमा नात्यांचा एक नवा प्रवास दाखवतो आणि मनाला भिडणारी सफर घडवतो.