
फोटो सौजन्य - Social Media
एकपात्री कार्यक्रमाने शंभरी ओलांडल्याच्या शुभेच्छा देण्यासाठी समीरला चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी संपर्क केला होता. त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि समीरला म्हणाले की “दादरलाच आहात मग घरी येऊन जा”. राज ठाकरेंच्या विशेष आमंत्रणाला मान देत अभिनेता समीर चौघुलेने राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच या विशेष भेटीचे चित्र सोशल मीडियावर शेअर केले.
समीरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये राज ठाकरे दिसत आहेत. तसेच समीरने या पोस्टखाली कॅप्शन देत राज ठाकरे यांचे आभार मानले आहे. त्याने नमूद केले आहे की, “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे १०० प्रयोग झाल्याबद्दल अभिनंदनाचे अनेक फोन आले ..पण एक कॉल खूपच अनपेक्षित आणि खास होता…तो होता अत्यंत दिलखुलास, दर्दी, कलासक्त नेते..माननीय राजसाहेब ठाकरे यांचा – “दादरलाच आहात मग घरी येऊन जा” ….आणि मग झाली एका राजामाणसाबरोबर एक सहजसुंदर भेट, भरपूर गप्पा आणि हास्यजत्रेवरील प्रेम.. आणि हो मी निघताना १०० प्रयोग झाल्याबद्दल मला आणि माझ्या सहचारिणीला दिलेली सुंदर भेटवस्तू ..मनापासून आभार साहेब….”
समीर चौघुलेच्या या पोस्टखाली अनेक सिनेकलाकरांनी कमेंट्स केले आहेत. तसेच शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे आणि समीर चौघुले यांच्या भेटीचे हे फोटो पाहून एका चाहत्याने केलेली ‘एक नेता एक अभिनेता’ ही कमेंट अतिशय आकर्षक आहे.