फोटो सौजन्य - Social Media
सध्या राज्यभरात ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहण्यासाठी सिनेप्रेमी उत्सुक आहेत. सिनेमा पाहण्यासाठीच वेड आणि प्रतीक्षा, संपूर्ण जगभरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमींमध्ये वाढत चालली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याने 10 वर्षांपूर्वी पाहिलेले या सिनेमाचे स्वप्न आता मोठ्या पडद्यावर उतरणार आहे. महाराष्ट्र दिनी हा सिनेमा संपूर्ण देशभरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सिनेमा मराठी तसेच हिंदी भाषेत पाहता येणार आहे. या सिनेमाला सुप्रसिद्ध मराठी संगीतकार जोडी अजय-अतुलने संगीतमय केले आहे. सिनेमातील Anthem ‘छत्रपती’ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. या गाण्यात अजय यांनी गायन केले आहे तर त्यांच्यामागे 80 कोरस गायकांनी साथ दिली आहे. त्यांपैकी एका गायकाने अजय-अतुल या जोडीबद्दल कृतद्न्यता व्यक्त करत भावुक पोस्ट केली आहे.
संगीतकार व गायक स्वप्निल गोडबोले यांनी अजय-अतुल यांच्यासोबतच्या आपल्या प्रवासाची भावनिक आठवण शेअर करत त्यांच्या सहवासातून मिळालेली प्रेरणा आणि शिक्षण अधोरेखित केले. २००९ पासून सुरू झालेल्या या प्रवासात कोरस गायक म्हणून काम करताना त्यांनी पुढे स्वतंत्र संगीतकार व पार्श्वगायक म्हणून कारकीर्द घडवली. ‘राजा शिवाजी’ चित्रपटासाठी काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी जोडलेली भावनिक नाळ अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटातील संगीताला त्यांनी अद्वितीय आणि प्रेरणादायी असे वर्णन करत, त्यात सहभागी होणे हे स्वतःसाठी भाग्य मानले. रितेश देशमुख तसेच संपूर्ण टीमचे त्यांनी कौतुक करत चित्रपटाला मोठे यश मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी, “जय भवानी, जय शिवराय” म्हणत त्यांनी हा चित्रपट प्रत्येक शिवभक्ताने पाहावा असे आवाहन केले.
View this post on Instagram
A post shared by Swapnil Godbole | Singer – Performer (@meswapnilgodbole)
या पोस्टमध्ये त्याने अजय अतुल यांना महाराजांचे ‘सांगीतिक प्रधान सेवक’ अशी उपमा दिली तर स्वतःला महाराजांचा मावळा म्हंटलं. तसेच महाराजांचे काही तरी ऋण फेडण्यासाठी अजय-अतुल यांनी जन्म घेतला असावा असे त्याने पोस्टमध्ये म्हंटले आहे. स्वप्नील गोडबोले फक्त अजय अतुल यांच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कोरस गायक म्हणून काम करेल असे त्याने स्पष्ट केले, यातून त्याचे अजय-अतुल या सांगीतिक जोडीबद्दलचे प्रेम आणि निष्ठा दिसून येते.






