‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात अपार उत्सुकता आणि रोमांच निर्माण करत आहे. कौटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत, सत्तेसाठीचे राजकारण आणि प्रेमाची खरी कसोटी यांचा संगम घडवत ही कथा दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालली आहे. मालिकेच्या कथानकाला अलीकडेच नवा कलाटणी देणारी घडामोड घडली आहे. शिवानी राजशेखरने सारंगच्या आयुष्यात प्रवेश केला आणि त्याला आपल्या मोहजाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. तिच्या हालचालींमुळे घरातील वातावरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं.
Bigg Boss 19: अभिषेक-आवेजची मैत्री तुटणार? टास्कदरम्यान मारामारीचा व्हिडिओ व्हायरल; अमाल मलिकही संतप्त
मात्र, सारंगने तिच्या प्रेमाला नाकारत सावलीप्रती आपली निष्ठा ठामपणे दाखवून दिली. आपल्या संसारासाठी आणि सावलीसाठी त्याने घेतलेला हा ठाम निर्णय शिवानीसाठी धक्कादायक ठरला. परिणामी, तिच्या मनात राग, मत्सर आणि सूडाची ठिणगी पेटली. शिवानीने सूड उगवण्याची शपथ घेतली आणि याच क्षणापासून मालिकेच्या कथानकाला एक नवं वळण मिळालं. दुसरीकडे, ऐश्वर्या आणि राजकुमार यांची गुप्त भेट घडते, जिथे एका नवीन कटाचा जन्म होतो. या कटामागील उद्देश स्पष्ट आहे. सारंग आणि सावलीच्या संसाराचा विनाश. अशा प्रकारे, एका बाजूला शिवानीचा सूड आणि दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या-राजकुमारचा कट, या दोन्ही गोष्टी एकत्र येत कथानकाला अधिकच थरारक आणि उत्कंठावर्धक बनवत आहेत. मालिकेतील या घडामोडींनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पुढे काय होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.