
जायरा वसीमसह 'या' ७ बॉलिवूड अभिनेत्रींनी अभिनयाला केला रामराम! (Photo Credit- X)
मुंबई: ग्लॅमर वर्ल्डमध्ये स्टारडम मिळवणे आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवणे सोपे नसते. अनेक कलाकार काही विशिष्ट कारणांमुळे अभिनय क्षेत्रातून बाहेर पडतात. यामध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी करिअरच्या ऐन शिखरावर असताना धर्माची वाट निवडली आणि अभिनयाला कायमचा रामराम ठोकला.
धर्मासाठी अभिनय सोडणाऱ्या प्रमुख अभिनेत्री (Actresses Left Acting For Religion)
सना खान (Sana Khan)
एकेकाळी बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सना खानचे नाव घेतले जायचे. सलमान खानच्या ‘बिग बॉस ६’ मध्येही ती दिसली होती. मात्र, तिने २०२० मध्ये अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. इस्लाम धर्माच्या मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली.
झायरा वसीम (Zaira Wasim)
‘दंगल’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’ फेम अभिनेत्री जायरा वसीमने २०१९ मध्ये सिनेसृष्टीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. तिने फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, तिचे काम तिच्या धार्मिक विश्वासांशी जुळत नव्हते. नुकतीच तिने गुपचूप ‘निकाह’ केल्याची बातमी समोर आली होती.
सोफिया हयात (Sofia Hayat)
अभिनेत्री सोफिया हयातने २०१६ मध्ये अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनचा ती भाग होती. मनोरंजन जग सोडून तिने ‘नन’ बनण्याचा निर्णय घेतला आणि आपले नाव बदलून ‘गैया मदर सोफिया’ असे ठेवले.
“तो चप्पल फेकून मारेल”, राखी सावंतने सलमान खानबद्दल ही गोष्ट का सांगितली?
ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni)
१९९० च्या दशकात अनेक हिट चित्रपट देणाऱ्या आणि दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलेल्या ममता कुलकर्णीने २००३ मध्ये अभिनय सोडला. धर्म आणि अध्यात्माची कास धरून तिने ‘माई ममता नंद गिरि’ म्हणून नवी ओळख निर्माण केली. अनेक वर्षे परदेशात राहिल्यानंतर ती साध्वी बनून भारतात परतली आहे.
बरखा मदान (Barkha Madan)
बरखा मदानने २०१२ मध्ये फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. ग्लॅमरची दुनिया सोडून तिने बौद्ध धर्माची नन बनण्याचा निर्णय घेतला आणि आपले नाव ‘ग्यालटेन समतेन’ असे ठेवले.
अनघा भोसले (Anagha Bhosale)
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ मध्ये ‘नंदिनी’च्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. अनघा भोसलेने २०२२ मध्ये अभिनय क्षेत्र सोडले. सध्या ती कृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे लीन झाली आहे. धार्मिक मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला.
नुपूर अलंकर (Nupur Alankar)
टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकर यांनी २७ वर्षांच्या कारकिर्दीनंतर वयाच्या ४६ व्या वर्षी अभिनयाला अलविदा केला. २०२२ मध्ये करिअरच्या शिखरावर असताना तिने अध्यात्माची वाट पकडली. सध्या त्या अभिनयापासून दूर राहून भिक्षा मागून आणि जमिनीवर झोपून साधे जीवन जगत आहेत.
”भूमिका योग्य वाटली नाही”,परेश रावल यांनी अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ चित्रपट नाकारला, म्हणाले..