चित्रपटामुळे दृष्टी गमावण्याचा धोका, अवयवही झाले असते निकामी; अभिनेत्याने सांगितली आपबिती
Extreme Physical Transformations For Roles In Movies : पा. रजनीकांत दिग्दर्शित ‘थांगलान’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. १५ ऑगस्टला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६८ कोटींची कमाई केलेली असून अभिनेता विक्रमने चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिनेत्याने अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केलेले आहेत. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी बॉडीमध्ये खूप बदल केल्याचे अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले. त्याने साकारलेल्या आव्हानात्मक भूमिकांविषयी त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
चियान विक्रम टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या धाटणींच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने भूमिकांसाठी तब्येतीत बदल करणं किती आव्हानात्मक आहे, यावर त्याने भाष्य केलं आहे. “मला नेहमीच आवडीच्या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करायला आवडते. मी केव्हाच एकाच साचेबद्ध साच्यात काम करत नाही. मला कोणत्याही गोष्टीचं व्यसन नसलं तरीही माझं जीवनच माझ्यासाठी एक नशा आहे. मी आवडत्या कामात कोणत्याही गोष्टीची परवा न करता त्यात दंगून जातो. ” असं अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं.
अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं की, मला वेगवेगळ्या भूमिकांसाठी वजन कमी करावं लागलं होतं. जर का मी ते केले नसते तर, माझ्या शरीरावर त्याचे फार गंभीर परिणाम झाले असते. मी ‘कासी’ चित्रपटात एका अंध गायकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे शूटिंगनंतर मला काही महिने व्यवस्थित दिसतंही नव्हतं. माझ्या पापण्यासुद्धा व्यवस्थित उघडत नव्हत्या. त्या भूमिकेमुळे माझ्या दृष्टीवर परिणाम झाला होता.
तर अभिनेत्याने ‘आय’ चित्रपटा दरम्यानचाही किस्सा शेअर केला होता. “या चित्रपटासाठी मला ८६ किलोवरून ५२ किलो वजन करायचं होतं. वजन हळूहळू कमी कर नाही तर गंभीर आजार होईल, असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. वजन कमी करण्याच्या नादात कुठला अवयव जर निकामी झाला तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. त्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच माझं वजन नियंत्रणातच कमी केलं.” असं अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं.