फोटो सौजन्य: Social Media
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सध्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. यापूर्वीही बऱ्याचदा बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या मिळाल्या आहेत. आता अशातच लॉरेन्स बिश्नोईवर आधारित वेबसीरिजची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला मिळत असणाऱ्या वारंवार धमक्यांचं प्रकरण ताजं असताना ही वेबसीरिजची घोषणा करण्यात आली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, फायरफॉक्स फिल्म प्रॉडक्शन हाऊसने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जीवनावर आधारित असलेल्या वेबसीरिजवर काम करायला सुरूवात केली आहे. या सीरीजचं नाव ‘लॉरेन्स- अ गँगस्टर स्टोरी’ (Lawrence- A Gangster Story) असं आहे. सीरीजमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या कॉन्ट्रॉव्हर्सी दाखवणार आहेत. सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे फायरफॉक्सचे उद्दिष्ट लॉरेन्स बिश्नोईच्या आसपास आधारित मनोरंजक आणि सत्य कथा सादर करण्याचे आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जीवनावर आधारित वेबसीरिज पूर्णपणे त्याच्या आयुष्यातील वादांवर आणि तो एक कुख्यात गँगस्टर कसा बनला यावर आधारित असेल. लॉरेन्स बिश्नोईचे नाव अनेक कॉन्ट्रॉव्हर्सीसोबत आणि अनेकदा भयानक घटनांसोबत जोडले गेले आहे. गुन्हेगारी जगतात त्याचा प्रवेश आणि त्याचे नेटवर्क आणि प्रभाव कसा वाढला आहे याची माहिती देणे हा या मालिकेचा उद्देश आहे. लॉरेन्स बिश्नोईची भूमिका कोणता अभिनेता करणार हे दिवाळीनंतर जाहीर होणार आहे.
यापूर्वी फायर फॉक्स प्रॉडक्शन हाऊसने अ टेलर मर्डर स्टोरी सारख्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती, जी उदयपूर टेलर कन्हैया लाल साहूच्या हत्येवर आधारित आहे. याशिवाय सचिन आणि सीमा हैदर यांच्या अनोख्या कथेवर हे प्रोडक्शन हाऊस कराची टू नोएडा घेऊन येत आहे.
लॉरेन्स बिश्नोई गेल्या दोन वर्षांत तीन मोठ्या हत्याप्रकरणांमुळे केवळ भारतातच नाही तर कॅनडामध्ये सुद्धा त्याची चर्चा होत आहे. लॉरेन्स हा बिश्नोई समाजाचा आहे. तो पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर लॉरेन्स पुढील शिक्षणासाठी चंदीगडला आला. पंजाब विद्यापीठाच्या डीएव्ही महाविद्यालयातून त्याच्या नंतर विद्यार्थी राजकारणातबाबत रस निर्माण होऊ लागला. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येत गोल्डी ब्रारशिवाय त्याचा हातही होता हे उघड झाले आहे.