ठाणे : ठाणे शहरातील प्रति तुळजापूर अशी ख्याती असलेले तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Mandir) हे जागृत देवस्थान असून असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तुळजापूर येथील देवीच्या मूर्तीशी साम्य असलेली तुळजाभवानी मंदीरातील मूर्ती भाविकांना आकर्षित करते. नवरात्रोत्सवकाळात मंदिरात होणाऱ्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ठाणे जिल्ह्यासह, मुंबई उपनगरातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
ठाणे महापालिकेच्या मुख्य इमारती पासून पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या गणेशवाडी परिसरात तुळजाभवानी मंदिर आहे. साधारण २० वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना झाली असून पाषाणापासून घडवलेलया तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरातील मूर्ती ही तुळजापूर येथील भवानी देवी प्रमाणेच असून केवळ येथील देवीच्या मूर्तीचा आकार लहान आहे. तसेच मंदिरात १२ महिने चालणारी पूजा, त्यात होणारे मंत्रोपचार, आरती कार्यक्रम तसेच विशेषतः नवरात्रात होणारे सर्व कार्यक्रम हे तुळजापूर देवीच्या वेळापत्रका प्रमाणेच पार पडतात. देवीच्या मूर्तीवर लावला जाणारा चंदनाचा लेप, कुंकवाची आरास आणि तुळजापूरच्या देवी प्रमाणेच नेसवली जाणारी साडीची पद्धत इत्यादी कारणांमुळे ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराची ख्याती प्रति तुळजापूर अशी आहे.
कार्यक्रम : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ब्रम्हमुहूर्तावर पूजा आणि महाअभिषेख केला जातो. त्यानंतर दुपारीच्या मुहूर्ताला घटस्थापना केली जाते. अष्टमीला हवन आणि गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. नवमीला प्रथेप्रमाणे देवी मातेला बळी देण्याची परंपरा असते. तर दसऱ्याच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास कुंकुमार्चनाचा विशेष कार्यक्रम पारपडतो. या कुंकुमार्चनाच्या कार्यक्रमावेळी देवाच्या मूर्तीवर ५१ साड्या चढवल्या जातात. त्यानंतर मंदिरात उपस्थित असलेले भाविकांकडून साधारण २५ किलो कुंकू आणि फुलांच्या पाकळ्या देवीवर उधळ्या जातात. कार्यक्रमाअंती देवीचा गाभारा हा पूर्णपणे कुंकवाने भरला जातो. त्यानंतर मंदिराचे दार बंद करून थेट सकाळच्या ब्रम्हमुहूर्तावर उघडण्यात येते. यावेळी देवीवरील श्रद्धेप्रमाणे भाविकांना गाभाऱ्यात असलेल्या कुंकवार देवीची पावले उमटल्याचे पाहायला मिळते असे मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांनी सांगितले.
तुळजाभवानी देवीवर भाविकांची श्रद्धा असल्याने नवरात्रोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने येथे दर्शनाची व्यवस्था केली जाते, असे केतन पाठक (मुख्य पुजारी) यांनी सांगितले.