भारतीय स्वयंपाक घरात हळदीचा वापर आवर्जून केला जातो. हळद केवळ जेवणाचा रंगच नाहीतर सुगंध आणि चव वाढवण्यास मदत करते. हळदीमध्ये असलेली गुणकारी घटक शरीरासाठी फायदेशीर आहे. हळदीचा रंग कायमच पिवळा असतो. डार्क पिवळ्या रंगाची हळद सर्वच पदार्थांसाठी आणि औषधांसाठी सुद्धा वापरली जाते. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील दुर्मिळ निळ्या हळदीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. याला निळे सोने असे सुद्धा म्हंटले जाते. हा पदार्थ कोणताही साधा मसाला नसून एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी पदार्थ आहे. (फोटो सौजन्य – istock)
औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली निळी हळद, जाणून घ्या हळदीच्या दुर्मिळ प्रकाराबद्दल सविस्तर माहिती

निळी हळद हा भारतातील दुर्मिळ पदार्थ आहे. याला वैज्ञानिकदृष्ट्या Curcuma Caesia या नावाने ओळखले जाते. याशिवाय बोलीभाषेत काळी हळद असे सुद्धा म्हंटले जाते. हळदीचा आतील रंग पिवळा नसून गडद निळ्या रंगाचा असतो.

भारतात आणि आग्नेय आशियातील काही निवडक भागांमध्ये निळी हळद सापडते. पिवळ्या रंगाच्या हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा गुणकारी घटक आढळून येतो.

निळ्या रंगाच्या हळदीमध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण अतिशय कमी असते. यामध्ये कापूर आणि विविध आवश्यक तेल आढळून येतात. निळ्या हळदीची चव कडू असते.

निळ्या रंगाच्या हळदीला कापूरसारखा तीव्र वास येतो. त्यामुळे निळी हळद स्वयंपाक घरात अजिबात वापरली जात नाही. ही हळद आयुर्वेद आणि घरगुती उपचारांसाठी वापरली जाते.

सांधेदुखी, स्नायू कडक होणे किंवा दुखापतीमुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी निळ्या हळदीचा वापर करावा. पारंपारिक औषधांमध्ये, खोकला, दमा आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांसाठी सुद्धा वापर केला जातो.






