
'मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास
मुंबई : मुंबईला आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचे आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झाला. मुंबईतील कचरा, रस्ते, खिचडी, मिठी नदीतील गाळात भ्रष्टाचार करुन दाखवणारे कार्यसम्राट नव्हे तर करप्शनसम्राट बनले, असा हल्लाबोल शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. येत्या १६ जानेवारी रोजी मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि मराठी माणूसच महापौर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
वरळी येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात मुंबई महापालिकेतील उबाठाच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार कोणामुळे झाला, मेट्रो प्रकल्पात खो कोणी घातला, बेस्टचं वाटोळं कोणी केलं, कोविड रुग्णांच्या तोंडातली खिचडी कोणी खाल्ली, बॉडीबॅगमधून पैसे बनवण्याचे पाप कोणी केलं, गरीब मुंबईकरांच्या घराच स्वप्न धुळीस कोणी मिळवल, मुंबईतील मोक्याचे भूखंड धनदांडग्यांच्या घशात कोणी घातले, बीडीडी चाळीतील रहिवाशी आणि गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं कोणी पुसली, पत्राचाळीच्या लोकांना देशोधडीला कोणी लावलं असे सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले. त्यांची भूमिका करप्शन फर्स्ट तर महायुतीचे मुंबई फर्स्ट आहे.
महाराष्ट्र फास्ट आणि मुंबई सुपरफास्ट हे आमचे मिशन आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांच्यासाठी म मराठीचा नव्हे तर मलिदा, मतलाबाचा आणि मुजोरीचा आहे. तर महायुतीसाठी म मराठीचा, महाराष्ट्राचा आणि महायुतीचा आहे. मराठी माणसाला खुराड्यात ठेवणारे वर्षाला नव्या माड्या बांधत राहिले. त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरची चलती होती. मात्र साडेतीन वर्षात महायुतीने मुंबईचा कायापालट केला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सत्तेसाठी लाचार होऊन बाळासाहेबांचे विचार सोडले, भाजपच्या पाठित खंजीर खुपसणारे खरे सूर्याजी पिसाळ आहेत, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. आम्ही कोणाची सत्ता घेऊन गेलो नाही तर सत्तेतून पायउतार झालो. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली आणि शिवसेनेचे खच्चीकरण होत होते म्हणून आम्ही धाडस केलं, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, इतके वर्ष सत्तेत या लबाड लोकांनी फक्त घबाड कमावण्याचे काम केले तेव्हा व्हिजन कुठे गेलं होते. जनतेने त्यांचा सिझन संपवला म्हणून त्यांना व्हिजन आठवलं, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तुम्ही मुंबईची तिजोरी लुटण्याचे काम केले. तुम्हाल तुमचे भविष्य सेफ करायचे आहे पण आम्हाला मुंबईकरांचे भविष्य सेफ करायचे आहे, असे ते म्हणाले. महायुतीचे काम म्हणजे नो रिजन ऑन धीस स्पॉट डिसीजन आहे. आजची सभा म्हणजे मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधातली ललकारी आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री असताना मुंबईसाठी आणि मराठी माणसांसाठी अनेक निर्णय घेतले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यांना मराठी भाषेचा नाही तर महापालिकेच्या तिजोरीचा पुळका आहे. मुंबई म्हणजे सोन्याची अंड देणारी कोबडी समजले. आतापर्यंत अंडी खाऊन झाले आणि कोबंडी कापायला निघाले. मुंबई आणि मराठी माणूस संकटात आहेत, अशी आवई उठवून २०१२ आणि २०१७ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या पण त्यांच्या संधीसाधू राजकारणाला मराठी माणूस भुलणार नाही. मुंबई मराठी माणसांची होती आणि सदैव मराठी माणसांचीच राहील. कोणाच्याही सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत तर विकासाचे वारकरी हवे आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले. आजची प्रचार सभा म्हणजे विजयाची नांदी आहे. लोकसभा जिंकलो, विधानसभेला ऐतिहासिक विजयाची नोंद केली आणि नगर पालिकांमध्ये ७५ टक्क्यांहून जास्त जागा मिळवून विजयाची हॅट्ट्रीक केली. आता महापालिकांमध्ये विजयाचा चौकार मारायचा आहे. २०२५ हा फक्त ट्रेलर होता आता पूर्ण पिक्चर बाकी आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आम्ही दोघेही भाऊ इथं आहोत. कोणी माईका लाल आला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
जनतेने बॅंड वाजल्यावर ब्रॅंडची आठवण झाली
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा मनसे युतीवर सडेतोड टीका केली. ते म्हणाले की मराठी माणसासाठी एकत्र आलेले दवंडी पिटवतात मग २० वर्षांपूर्वी कोणासाठी आणि कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका.त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता अहंकार होता पण आता जनतेने बॅंन्ड वाजवल्यावर तुम्हाला ब्रॅंडची आठवण आहे. पण खरा ब्रॅंड फक्त बाळासाहेब आहेत आणि महायुतीचा सामान्य कार्यकर्ता हा आपला ब्रॅंड आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.