Agriculture Minister Manikrao Kokate apologizes on controversial statement farmer loan waiver
नाशिक : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांना मोठे निराश केले आहे. यंदाच्या महायुतीचे दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन होते. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. त्यामुळे माफीच्या प्रतिक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर अर्थिक संकट आले आहे. यामध्ये राज्याचे कृषीमंत्री हे शेतकऱ्यांविरोधात भाष्य करत असल्याचे दिसून आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मस्करीमध्ये हे वक्तव्य केले असल्याचे कोकाटे म्हणाले आहेत.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गेलेल्या माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केले. यामुळे संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली. यामधून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ लागली. कृषीमंत्रीच शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यास असंवदेनशीलपणा दाखवत असल्याचा आरोप करण्यात आले आहे. राजकीय वर्तुळातून जोरदार टीका झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या माणिकराव कोकाटे यांना एका शेतकऱ्याने कर्जमाफीबद्दल विचारले. यावेळी ते म्हणाले, अजितदादा म्हणत आहेत, कर्जमाफी होणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्यांची तर कर्जमाफी होईल का? असा प्रतिप्रश्न शेतकऱ्याने केला. यावर कोकाटे म्हणाले की, “कर्ज घ्यायचं आणि पुढचे पाच-दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. जोपर्यंत कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत वाट पाहायची, असं शेतकरी करतात. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीत एका रुपयांचीतरी गुंतवणूक आहे का? तसेच शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” माणिकराव कोकाटे यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी मस्करी केल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांना शासनामार्फत नुकसानभरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणूनच रामजन्मभूमीचा मुहूर्त साधून आज मी जाणीवपूर्वक काळाराम मंदिरात दर्शनास आलो होतो. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी मी प्रभू रामचंद्रासाठी समृद्धी आणि सुख मागितले आहे. माझ्या कालच्या वक्तव्यामुळे. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी मस्करीमध्ये बोललो. मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान-सन्मान दुखावला असेल, मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कालदेखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे,” अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.