Agriculture Minister Manikrao Kokate assured that he would remain sensitive towards farmers.
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चर्चेत आले आहेत. कृषीमंत्री असून देखील माणिकराव कोकाटे हे अनेकदा शेतकऱ्यांबाबत अपमानस्पद वक्तव्य करताना दिसून येतात. आता सत्ताधारी पक्षामध्ये असून आणि त्यांच्याच पक्षाचे प्रमुख हे राज्याचे अर्थमंत्री असून देखील माणिकराव कोकाटे यांनी शासनाला भिकारी म्हटले आहे. तर माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये जंगली रम्मी खेळताना दिसले आहेत. यावरुन आता माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण देशामध्ये शेतकरी आत्महत्येमध्ये प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. असे असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळताना दिसले. याचा व्हिडिओ देखील आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले. माणिकराव कोकाटे हे व्हिडिओमध्ये गेम खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसत असून देखील जाहिरात पुढे ढकलताना गेम सुरु झाली असल्याची थाप मारत आहेत. या प्रकरणामुळे विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते जाण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माणिकराव कोकाटे हे कृषीमंत्री असून अनेकदा शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्तव्य करत असतात. यापूर्वी देखील शेतकरी आत्महत्या, पीकांचा पंचनामा अशा अनेक गोष्टींवरुन कोकाटे यांनी वादग्रस्त विधाने केले होती. आता ते सभागृहामध्ये गेम खेळत असल्यामुळे त्यांचे कृषीखाते काढून घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या खात्यामध्ये बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. माणिकराव कोकाटे यांना पहिल्यांदाच मंत्रिपद दिल्यामुळे त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीमधून केली जात असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र्संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, कृषी खाते हे माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसरे मंत्री असलेले मकरंद आबा पाटील यांच्याकडे कृषी खाते जाण्याची शक्यता आहे. सध्या मकरंद पाटील यांच्या मदत व पुनर्वसन खातं आहे. हे खाते माणिकराव कोकाटे यांना मिळू शकतं. तर कृषीमंत्रीपदाची धुरा ही मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. कृषी खात्यामध्ये संवदेनशील नेता असावा अशी मागणी वाढली आहे.
अजित पवार स्वतःकडे घेणार का ‘पॉवर’?
यापूर्वी देखील अजित पवार यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत कडक निर्णय घेण्यात आला होता. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते होते. मात्र वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. बीडच्या राजकीय वादामध्ये मुंडेंचे नाव आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राजीनामा घेतला होता. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेत नव्याने मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्या छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते देण्यात आले होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचे खाते काढून घेतल्यानंतर कृषी खाते दुसऱ्या नेत्याला देण्यात येणार की अजित पवार स्वतःकडेच हे खाते ठेवणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाली आहे.