
अजित पवार समर्थकांना उभारी
पुणे / दीपक मुनोत : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यातील जनतेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार समर्थन दिले आहे. त्यामुळे आता शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकारणात उभारी मिळाली आहे.
नव्याने आकाराला येणाऱ्या नागरी भागात राष्ट्रवादीला अनुकूल कौल मिळाला आहे. अशा निमशहरी भागात नागरी सुविधांचा प्रचंड तुटवडा असतो. तिथे साधारणतः काम करणाऱ्या नेत्याला किंवा पक्षाला पाठिंबा मिळतो. या नेत्याकडून किमान सुविधा मिळतील, अशी अपेक्षा त्यातून व्यक्त झालेली असते. उत्पन्न कमी आणि सुविधांसाठीचा खर्च जास्त असे विसंगत चित्र इथे असते. याचा मेळ अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांना घालावा लागणार आहे. शिवाय येथील रहिवाशांना मोठ्या शहराशी कनेक्टिव्हिटी मिळावी, अशी अपेक्षा असते. विमानतळ, आयटी हब, शैक्षणिक केंद्र, मेट्रो अशामुळे जिल्ह्यात नागरीकरण वेगाने होत आहे. त्या नागरीकरणावर नियंत्रण ठेवणे आणि नियोजन करणे हे काम अजित पवार यांना करावे लागेल.
पुणे जिल्ह्यात अनेकांनी नेतृत्व केले. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर कै.यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दाला मान होता. मामासाहेब मोहोळ, अण्णासाहेब मगर, शंकरराव उरसळ, संभाजीराव काकडे, बापूसाहेब थिटे आदी नेत्यांचा प्रभाव होता. सहकारी दूध डेअऱ्या, सहकारी कारखाने, शिक्षण संस्था, पाणी अशा कामांना या नेत्यांनी चालना दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार निवडून आले आणि मंत्रीच झाले आणि हळूहळू जिल्ह्यावर त्यांची पकड बसू लागली. याच दरम्यान अनंतराव थोपटे, रामकृष्ण मोरे, शंकरराव बाजीराव पाटील यांचा वेगवेगळ्या भागात प्रभाव होता.
मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर शरद पवार यांचा प्रभाव प्रचंड वाढला. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सहकारी दूध संस्था यावर शरद पवार यांची पकड वाढत गेली. शरद पवार यांचा पुणे जिल्हा, अशी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली. त्यानंतर १९९० सालच्या सुमारास अजित पवार राजकारणात आले आणि शरद पवार यांनी हळूहळू जिल्ह्याचा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवला. काका पुतण्याचा अंमल जिल्ह्यावर अनेक वर्षे राहिला.
मात्र, काका पुतण्यामध्ये २००४ नंतर सूप्त संघर्ष चालू राहिला. संधी असूनही अजित पवार यांना मुख्य मंत्री पद मिळाले नाही, याचे शल्य त्यांच्या समर्थकांमध्ये राहिले. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे राजकारणात आल्यावर हा सुप्त संघर्ष अधिकच चिघळला. २०२४ च्या निवडणुकीत हा संघर्ष टोकाला गेला. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दोघींमध्ये लोकसभा निवडणूक झाली. सुप्रिया सुळे जिंकल्या. त्यानंतर लगोलग झालेल्या विधानसभेत मात्र अजित पवारांना कौल दिला.
नगरपालिका जिंकून अजित पवारांनी निम्मी लढाई जिंकली
अजित पवार आणि शरद पवार हे राजकारणात विभक्त झाले. त्यानंतर अजित पवार हे भाजपबरोबर युती करून सत्तेत गेले. शरद पवारांनी भाजप विरोधाची भूमिका कायम ठेवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी होती. नगरपालिका जिंकून अजित पवार यांनी निम्मी लढाई आता जिंकलेली आहे. शरद पवार यांचा पक्ष अक्षरशः गारद झालेला आहे. मध्यंतरीच्या काळात कोरेगाव पार्क येथे जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात पार्थ पवार अडचणीत आहे. सत्ताधारी भाजपनेही जिल्ह्यात अजित पवार यांना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्या सर्वावर मात करत अजित पवार यांनी नेतृत्व सिद्ध केले.
महापालिका निवडणुकीत अजित पवार स्वतंत्रपणे लढणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थकही मिळत आहेत. पुणे शहराच्या राजकारणात प्रभाव ठेवून त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये वर्चस्व आणायचे आहे. याकरिता नगरपालिकांचा निकाल अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला मानसिक बळ देणारा ठरणार आहे.
हेदेखील वाचा : Pune Nagar parishad Result : पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल