
"मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे...", अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले...
सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन होताच राष्ट्रवादीमध्ये जोरदार हलचाली सुरु झाल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील असा निर्णय दोनच दिवसात घेण्यात आला. मात्र याबाबतचे कोणतेही निर्णय माझ्याशी चर्चा करून झाले नसल्याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, “ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याच्या सर्व बैठका मी स्वत:च केल्या होत्या, अजितदादा त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती, अलीकडच्या काळात अनेक बैठका झाल्या, अनेकदा ते माझ्या घरीच येऊन चर्चा करयचे, जवळपास चारवेळा ते रात्री येऊन चर्चा करून जेवण करून उशिरा जायचे, साहेबांच्या देखत मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत, आणि माझ्या बद्दल जनमाणसात जी प्रतिमा झाली आहे, ती पुसून मला पुन्हा साहेबांच्या बरोबर साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहे. याबाबत त्यांचा आग्रह होता, पवार साहेबांच्या बाबत त्यांच्या मनात प्रचंड आदर होता, त्यांनी त्याबाबत खूपवेळा माझ्याकडे भावना व्यक्त केल्या. मागील दोन अडीच वर्षांचा कालखंड विसरून आपण सर्वजण एकत्र येऊ, महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा एकसंघ करू, ही त्यांची अंतिम आणि फार तीव्र इच्छा होती.”
ते म्हणाले, “ अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांसह दोनवेळा बैठक झालेली होती, त्यानंतर दि. १६ जानेवारी रोजी शेवटी माझ्या घरी बैठक झाली, त्यावेळी आमच्या पक्षातील काही प्रमुख यावेळी उपस्थित होते, आणि जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढून निवडणुका झाल्यानंतर कार्यक्रम घेऊ, त्यांनी तर दि.८ सांगितली, मात्र नियोजित कार्यक्रम असल्याने पुढे करू असे सांगताच, जयंत पाटील सांगतील त्या दिवशी करू असे दादांनी सांगितले, त्यावेळी आम्ही १२ तारीख निश्चित केली.”
अजितदादांसोबत झालेल्या बैठीकीत एकत्रीकरणाची चर्चा झाल्यावर पवारसाहेबांना सांगण्यासाठी आम्ही विमाने जाऊ असे म्हणताच दादा म्हणाले तिथली धावपट्टी लहान आहे, माझे विमान तिकडे उतरणार नाही, मग आम्ही पहाटे गाडीने निघून सकाळी पवार साहेबांकडे जाऊन निर्णय सांगून १२ तारीख ठरवली. आठ नऊ पर्यत निवडणुका पूर्ण होतील, त्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र करू असं ठरले.
ते म्हणाले, काही बैठकांना सुप्रिया सुळे यांना देखील उपस्थित ठेवण्याचा मी प्रयत्न केला, राष्ट्रवादी एकत्रीकरण बाबत पक्षातील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन बूजबळ यांच्यासह सर्वच पक्षातील अन्य आमदारांना देखील त्यांनी याबाबत कल्पना दिली असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले होते. मी सांगितल्यावर माझे सर्व आमदार निर्णय मान्य करतात, कोणाचेही वेगळे मत असणार नाही, असेही दादा म्हणाले होते.
अजितदादांनी सर्व चर्चा माझ्याशी करून निर्णय झाल्यानंतरच आम्ही सर्व नेत्यांना या चर्चेत सहभागी करून घेतले होते, सर्वांची याबाबत सहमती होती. अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला पाहिजे, एकत्रीकरणाला कोणाचाही विरोध नव्हता, उलट पाठींबा होता. त्यामुळे आता काय निर्णय होणार हे पहावे लागणारे आहे, सध्या त्यांच्या पक्षाचे सर्व सर्व निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ घेत आहेत.