
निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी
कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
मनपा अर्ज छानणीची प्रक्रिया सुरू
अमरावती: मनपा अंतर्गत ६ प्रभागातील (Amravati ) अर्ज छानणी बुधवारी (दि. ३१) रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रात्री ८ वाजेपर्यंत या प्रभागातील अर्जाची छानणी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली. याप्रमाणे, रहाटगाच प्रभागात ४७ उमेदवार रिंगणात आहेत, तर संत गाडेबाबा प्रभागात २९, महेंद्र कॉलनी आणि नवसारी प्रभागात प्रत्येकी ३७, जवाहरगेट बुधवारा प्रभागात २५. छायानगर प्रभागात २०, तसेच रहमत नगर व अलीमनगर प्रभागात प्रत्येकी २२ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले.
महानगरपालिका निवडणुकीतील तिकीट वाटपामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून काँग्रेस आणि इतर पक्षांतील माजी नगरसेवकांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी उघड संताप व्यक्त केला. या घटनेमुळे भाजपचे निवडणूक प्रभारी व पदाधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले. शहरात दिवसभर हा वाद चर्चेचा विषय ठरला.
मनपाच्या राजापेठ झोन कार्यालयात नामांकन तपासणी सुरू असताना पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते संगम गुप्ता, त्यांच्या पत्नी, सचिन डाके, लखनपाल आदी समर्थकांसह दाखल झाले. यावेळी निवडणूक प्रभारी जयंत डेहनकर, शिवराय कुलकर्णी आणि दिनेश सूर्यवंशी उपस्थित झाले, तेव्हा कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला. कार्यकत्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले, ‘आमची तिकिटे कापली गेली असतील तर समजून घेता येईल, मात्र पक्षविरोधक व काँग्रेसमधील उमेदवारांना तिकीट का देण्यात आले? परिस्थिती तणावपूर्ण झाली, काही प्रयत्न करूनही कार्यकर्ते शांत झाले नाहीत.
नंतर संतप्त कार्यकर्ते राजापेठ येथील भाजप कार्यालयात गेले. त्यांनी विचारले, ‘कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीका करणाऱ्या काँग्रेसमधील बंडू हिवसेसह इतरांना रातोरात भाजपची तिकिटे कशी देण्यात आली?’ या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. काही पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातून मागील दाराने निघून गेल्याचेही कार्यकत्यांनी सांगितले. दरवेळी काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून असंतोष दिसून येते, मात्र यावेळी भाजपमधील निष्ठावान कार्यकत्यांच्या दुर्लक्षामुळे नाराजी विशेषतः तीव्र झाल्याचे चित्र आहे.