Photo Credit- Social Media
महायुती सरकारमध्ये गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. आज संध्याकाळपर्यंत आपल्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असे गोगावले यांनी सांगितले.
यंदाच्या १५ ऑगस्टला रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून आपणच ध्वजारोहण करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे गोगावले यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील या जुन्या वादावर अखेर पडदा पडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माध्यमांशी बोलताना भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आपले नाव निश्चित झाल्याचे सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला.
या चर्चेनंतर आज संध्याकाळपर्यंत पालकमंत्री म्हणून आपल्या नावाची घोषणा केली जाईल, असे गोगावले म्हणाले. त्यामुळे त्यांच्या दाव्याची अधिकृत घोषणा कधी होते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले. शिवसेनेकडून भरत गोगावले यांनी या पदासाठी दावा केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांचे नाव पुढे करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मुलगी आदिती तटकरे यांच्यासाठी या पदासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती. दुसरीकडे रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांकडूनही पालकमंत्रिपद शिवसेनेकडेच राहावे, अशी भूमिका मांडण्यात आली होती. या राजकीय संघर्षामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय बराच काळ रखडला.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे आमदार झाले. या जागेवर शिवसेनेकडूनही दावा करण्यात आला होता. मात्र वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर शिवसेनेने माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा केल्याचे सांगितले जाते.
हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’
या राजकीय तडजोडीच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र आता भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्यामुळे या समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे.
अद्याप पालकमंत्रिपदाबाबत अधिकृत आदेश जारी झालेला नसल्याने अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. गोगावले यांचा दावा खरा ठरल्यास रायगडमधील महायुतीतील दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळू शकतो. त्याचबरोबर रायगडचा निर्णय झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबतही लवकरच तोडगा निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.






