BJP's Chandrakant Patil's reaction on Prajakta Mali controversy
पुणे : राज्यामध्ये सध्या बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. सर्व पक्षांनी मोर्चा काढून या प्रकरणातील दिरंगाईवरुन महायुती सरकारला घेरले आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. मात्र याला 20 दिवस उलटून देखील अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तसेच सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावरुन अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र त्यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेतल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना काही महिला कलाकारांची नावे घेतली आहेत. यामध्ये त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे देखील नाव घेतले असून त्यांच्या विधानामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत. यावरुन भाजप नेते सुरेश धस यांनी माफी मागणार नसल्याचे देखील म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष भेटून बोलणार असल्याचे देखील अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची भाजप आमदाराकडून सुरु असलेल्या मानहानीवर देखील भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच स्त्रीचं चरित्र आणि त्याच्यावर शिंतोडे उडू नये याची काळजी घेतली. मात्र सध्या महिलांची बदनामी होईल असं बोलणं सुरु आहे. तो विषय सुरु आहे तो राजकीय आहे. तसाच समाजिक आणि संवेदनशील विषय देखील आहे. मात्र असं नाव जोडणं योग्य नाही,” अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, “सुरेश धस हे माझे चांगले मित्र आहेत. ते पार्टीचे कार्यकर्ते देखील आहेत. मी काल गुजरातला गेलो होतो. मी त्यांना काल दोन वेळा फोन लावला. पण लागला नाही. त्यांनी मी आज सांगेन की, एका महिलेची बदनामी होईन असे वक्तव्य करणं योग्य नाही. त्यांना ते शोभत नाही. ते पार्टीचे कार्यकर्ते असल्यामुळे पार्टीत बोलायला पाहिजे,” अशी भूमिका भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.