
नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम
विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तोडगा निघण्याबाबत चर्चा केली जात होती. परंतु, प्रा. सोले रिंगणात कायम असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच भाजपला बंडखोरी शमवण्यात अपयश आल्याचे अधोरेखित झाले. नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे, काँग्रेसचे अभिजित वंजारी व प्रा. अनिल सोले अशी तिहेरी लढतीचे संकेत मिळत आहे. तर, पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत महायुतीतील अंतर्गत संघर्ष टळला असून, भाजपने मित्रपक्षांच्या उमेदवारांमुळे निर्माण झालेली कोंडी दूर केली आहे.
मंगेश चिवटे, माने यांचे अर्ज मागे
पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनीही अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. अखेर वरिष्ठांच्या आदेशानंतर चिवटे यांनी माघार घेतली. दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
माने यांनीही घेतली माघार
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे आणि समित कदम यांनी केलेल्या विनंतीनंतर माने यांनीही माघार घेतली. दोन्ही उमेदवारांच्या माघारीमुळे महायुतीत जागावाटपावरून निर्माण झालेला तणाव कमी झाला आहे.
निवडणुकीचे चित्र स्पष्ट
विधान परिषदेच्या पाच जागांचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहेत. यामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. ज्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली, तेथील काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, तर इतर ठिकाणी बंडखोर अर्जावर ठाम आहेत, ज्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या अधिकृत उमेदवारांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
गिरीश व्यास यांचा पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा
जनसंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बच्छराज व्यास यांचे सुपुत्र गिरीश व्यास यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांनी नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी महाल परिसरात सोले यांच्या प्रचारासाठी कार्यालयाची सुरुवातही केली आहे.