BJP leader Navnath Ban made political criticism of MP Sanjay Raut
पुणे : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली असून सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली आहेत. यानंतर महाराष्ट्रामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांच्या विजयाची अपेक्षा केली होती. यानंतर आता भाजप पक्षांच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संजय राऊतांचे वस्त्रहरण झाले असल्याची जहरी टीका भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने खासदार संजय राऊत यांना पुरते उघडे पाडले. उबाठा, राऊत आणि युपीएला आरसा दाखवणारी अशी ही निवडणूक होती. एनडीएची मते फुटून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएची सरशी होईल असा डंका वाजवणाऱ्या राऊतांना निकालानंतर ‘जोर का झटका’ बसला. निकालानंतर एनडीए आणि युपीए मध्ये तब्बल 150 मतांचा फरक समोर आला. उबाठाच्या खासदारांनीच उबाठा आणि तुमच्यावर काडीमात्र ही विश्वास ठेवला नाही. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा शर्ट ओढता-ओढता राऊतांची काय अवस्था झाली. पुरते उघडे पडूनही आमची इज्जत शाबूत आहे असा केविलवाणा दावा राऊत करत आहेत हे हास्यास्पद असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधींचं नेतृत्व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पुरते निष्प्रभ ठरले आहे. युपीएच्या खासदारांनीच क्रॉस व्होटिंग करून आपली खदखद व्यक्त केली. यातली सगळ्यात मोठी गंमत म्हणजे महाराष्ट्रातून एनडीएला सर्वाधिक साथ मिळाली. हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं आजचे सत्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उचलली जीभ लावली टाळ्याला अशा आवेशात टीका करताना, 2019 मध्ये उबाठा आणि खासदार राऊत यांनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसूनही देवेंद्र फडणवीस पुन्हा उभे राहिले हे राऊत यांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी खडसावले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची जादुई कांडी, त्यांचा करिष्मा, आणि त्यांची धोरणात्मक अचूकता दिसून आली आहे. राऊत तुम्हाला राज्यसभेत केवळ अर्ध्या मताने आघाडी मिळाली होती यांची जाणीव ठेवा, आणि पुढील तीन वर्षांत तुम्हाला पुन्हा राज्यसभा मिळणार नाही, हे ही सत्य स्वीकारा असाही टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेपाळसारखे अराजक माजावे हीच राऊतांची इच्छा ?
संजय राऊत यांनी ही परिस्थिती देशामध्ये देखील उद्भवू शकते अशी शंका उपस्थित केली होती. यावर नवनाथ बन म्हणाले की, देशात नेपाळसारखे अराजक माजेल असे भविष्य वर्तवणारे राऊत हे खंडोजी खोपड्याचे वारसदार आहेत का? जसा खोपडे स्वराज्यात द्रोह करून गेला, तसेच महाराष्ट्रद्रोह आणि देशद्रोहाचे बीज तुम्ही रोवताय का? असा सवाल बन यांनी विचारला. हा देश स्वामी विवेकानंदांचा, महात्मा गांधींचा, आणि आज सक्षम नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदीजींचा आहे. येथे कधीही अराजकता माजणार नाही. खरं तर, जे तुमच्या मनात आहे तेच तुमच्या ओठावर आलं. भारताला नेपाळसारख्या अस्थिरतेत ढकलण्याची तुमची सुप्त इच्छा आहे का? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र आणि भारत इतके सक्षम आहेत की, तुमचे हे कपटी डाव कधीच यशस्वी होणार नाहीत. उलट तुम्ही पेटवलेल्या आगीत तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नवनाथ बन यांनी दिला आहे.