माहीम विधानसभा मतदारसंघात येणार रंगत; अमित ठाकरेंविरोधात भाजप देणार नाही उमेदवार?
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यातच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे सांगितले आहे. हिंदुत्व समर्थक आणि आमचे मदतनीस राज ठाकरे यांनी आपल्या मुलाला माहीममधून उमेदवारी दिली आहे, त्यामुळे आपण अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असे आवाहनच त्यांनी मतदारांना केले आहे.
अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलायला हवे. मुख्यमंत्री शिंदेंच्या सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांना आपला विरोध नसल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी सरवणकर म्हणाले की, हे शेलार यांचेच मत आहे, महायुतीची तशी भूमिका नाही. माहीम विधानसभा मतदारसंघातून आम्ही जोरदार लढणार आहोत. माहीममधून महेश सावंत यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तिकीट दिले आहे, हे विशेष.
दरम्यान, राज ठाकरेंनी केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी महायुती आपल्या एका जागेचा त्याग करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला खूप मदत केली होती. त्यामुळेच अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी महायुती या जागेवरून आपल्या उमेदवाराचे नाव मागे घेण्याच्या विचारात आहे. या मुद्द्यावर लवकरच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे.
मैत्रीची किंमत मी का चुकवावी?
सदा सरवणकर यांनी मैदानातून माघार घेण्यास नकार देत अमित ठाकरे यांच्या राजकीय क्षमता आणि मतदारसंघातील योगदानावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, ‘कुणी मित्र म्हणून कर्तव्य बजावत असल्याने अमित ठाकरेंनी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या मैत्रीची किंमत मी का चुकवावी?’ असेही त्यांनी म्हटले आहे.