BJP Minister Nitesh Rane reacts to Malegaon bomb blast verdict political news
Nilesh Rane on Malegaon blast : मुंबई : महाराष्ट्रातील मालेगावमध्ये रमजानच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भिक्कू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल हाती आला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर नितेश राणे यांनी टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मंत्री नितेश राणे म्हणाले की, “या मालेगावच्या प्रकरणातून समाजाची जी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला होता त्यांच्या तोंडावर चपराक बसली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करु नये. परत परत एकच विषय सिद्ध होतो आहे की आतंकवादाचा रंग आणि जिहादाचा रंग हा हिरवाच आहे,” अशी गंभीर शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “कॉंग्रेस काळामध्ये हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना मात्र हे शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षेत आहे हे पुन्हा सिद्ध झालंय. खरंतर या लोकांनी हिंदू समाजाची माफी मागितलं पाहिजे. यांनी मंदिरात जाऊन हिंदू समाजाची माफी मागावी,” अशी मागणी देखील मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मालेगाव प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, “पुरावे यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. ते कोर्टात कोणतेही पुरावे सिद्ध करू शकले नाहीत. सर्व पद्धतीने हिंदू समाजाची बदनामी करणे हा कार्यक्रम कॉंग्रेसकडून चालू होता. आतंकवादाला ताकद देणे, जिहादला ताकद देणं हे त्यांचे सुरू होतं. ज्यांनी ज्यांनी यांची बदनामी केली, त्यांनी नाक रगडून माफी मागितली पाहिजे. या लोकांनी काही नसताना 17 वर्ष शिक्षा भोगली. त्यावेळीच्या कॉंग्रेस सरकारला हिंदू द्वेशच करायचं होतं, हे आपण बघतो. पाकिस्तानची भाषा आणि कॉंग्रेस पक्षाची भाषा एकच असते,” अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.