Gopichand padalkar on reaction on Maharashtra Assembly fighting case
मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, विधानसभेच्या लॉबीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये पहिल्यांदा हाणामारी झाल्याचे दिसून आले आहे. यावरुन आता विरोधकांनी जोरदार टीका केली असून कारवाईची मागणी केली आहे. यावर आज विधानसभेमध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान या मारामारीवर आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काल (दि.17) झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “विधानसभेच्या आवारामध्ये झालेल्या प्रकारावर मी काल माझी भूमिका व्यक्त केलेली आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष महोद्यांजवळ जाऊन दिलगिरी देखील व्यक्त केली होती. अध्यक्षसाहेबांना विनंती केली की, माझ्या सहकाऱ्यांजवळून चूक झालेली आहे. त्यांना सक्त ताकीत देऊन काय कारवाई असेल ती कारवाई करा. तो त्यांच्या अधिकारातला विषय आहे” असे स्पष्ट मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “रात्री उशिरा FIR दाखल झालेला आहे. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती सर्वोच्च आहेत. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली, त्यावर माझं कुठलही मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे, त्याला कोर्टात सामोरे जाऊ” असे देखील आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. या संदर्भामध्ये आज (दि.18) दुपारी दीड वाजता विधानसभेमध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय देणार आहेत.
त्याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्य गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांना डोळ्यांनी खुणावत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. या व्हिडिओबाबत देखील माध्यमांनी गोपीचंद पडळकर यांना प्रश्न केला. ते म्हणाले की, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही. एवढी सगळी गर्दी आहे. आम्ही तिथे कोपऱ्यात होतो. सगळे व्हिडिओ काढा. मी दहा-पंधरा मिनिटे तिथे होतो. आमचे कार्यकर्ते होते, त्यांच्यासोबत फोटो काढत होतो” असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “काल सभागृहामध्ये माझी लक्षवेधी होती. त्यामुळे अख्खा दिवस मी सभागृहात होतो. परंतु कामकाजात नऊ लक्षवेधी झाल्या. दहावी माझी लक्षवेधी होती. नंतर सांगण्यात आलं की उद्या होईल. आता सकाळी 9 वाजता सभागृहात आलोय. तुम्ही सगळं फुटेज काढून बघा. आमचे मंत्रिमहोदय तिथे नव्हते. अर्ध्या तासाची चर्चा लक्षवेधी होणार नाही म्हणून मी निघालो होतो. ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला, त्याचा आदर करत न्यायालयात बाजू मांडू” असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.